‘हर हर महादेव’ च्या गजरात गोव्यात शिवभक्तीचा महाकुंभ
पणजी : राज्यात बुधवारी महाशिवरात्री उत्सव विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी हर हर महादेवच्या जयघोषाने देवस्थानचे परिसर दूमदुमून गेले होते. राज्यातील पेडणेपासून काणकोणपर्यंतच्या तमाम शिवमंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. त्यानिमित्त सर्व देवस्थानांमध्ये भाविकांना स्वहस्ते शिवपिंडीवर दूध, बेलपत्र अर्पण करून महाभिषेक, लघुऊद्र आदी धार्मिक विधी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय अनेक ठिकाणी भजन, संगीत, गायन, नाट्याप्रयोग, कीर्तन, नामजप आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील काही प्रमुख आणि प्रसिद्ध देवस्थानांपैकी असलेल्या हरवळे येथील श्रीऊद्रेश्वर, तांबडी सूर्ल येथील श्रीमहादेव, नागेशी येथील श्रीनागेश, रामनाथी येथील श्रीरामनाथ, मंगेशीतील श्रीमंगेश, शिरोडा शिवनाथी येथील श्रीशिवनाथ, पर्वत बोरी येथील श्रीसिद्धनाथ, जुने गोवे ब्रह्मपूरी येथील श्रीगोमंतेश्वर, शंकरवाडी ताळगाव येथील श्रीशंकर, नार्वे येथील सप्तकोटीश्वर, केपे पारोडा येथील श्रीचंद्रेश्वर भूतनाथ, काणकोण येथील श्रीमल्लीकार्जून, आदी संस्थानात हा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अस्नोडा कैलासनगर येथील श्री देव महेश्वर मंदिर, म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थान, मुरगांव ऊमडावाडा येथील श्री ऊमडेश्वर देवस्थान, सावईवेरे येथील श्री अनंत देवस्थान, खांडेपार येथील श्रीव्याघ्रेश्वर महादेव देवस्थान, सांखळी सुर्ल येथील श्री सिद्धेश्वर मंदिर, बिठ्ठोण येथील श्रीशंभो महादेव संस्थान, म्हापसा गंगानगर खोर्ली येथील श्री देव गंगामहेश्वर शिवलिंग संस्थान, यांसह गावोगावी असलेल्या लहानमोठ्या अशा शेकडो शिवमंदिरांमध्येही हजारो भाविकांची गर्दी दिसून आली.
या महाउत्सवात राज्याच्या विविध भागातील आमदार, मंत्री आदी राजकीय नेत्यांनीही उपस्थिती लावत अभिषेकादी धार्मिक कार्यात भाग घेतला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हरवळे येथील श्रीऊद्रेश्वर मंदिरात अभिषेक केला. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ब्रह्मपूरी येथील श्रीगोमंतेश्वर मंदिरात अभिषेक केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, हरवळे मंदिर परिसराचा आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येणार असून त्यावर सुमारे 17 कोटी ऊपये खर्च करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तांबडी सुर्ल येथील श्रीमहादेव मंदिरालाही भेट देऊन प्रार्थना केली. त्यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक आमदार गणेश गावकर उपस्थित होते.