महाद्वार रोड... जयंत नारळीकर आणि त्यांचे साधेपण
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
महाद्वार रोडवरून कपिलतीर्थ मंडईत जायला एक छोटा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या बरोबर समोर नारळीकर भुवन आहे. त्याचे स्वरूप पारंपरिक वाड्यासारखे नसले तरी दोन मजली लाकडी गॅलरीचे हे घर लक्षवेधी होते. नारळीकरांचे आजोबा वासुदेव हे कोल्हापुरातले वेद पंडित होते. मिरजकर तिकटीच्या विठ्ठल मंदिरात कीर्तन करायचे. वडील विष्णू हे विद्यापीठ हायस्कूल आणि राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षण झालेले. आई भेंडी गल्लीतील हुजूर बाजार या अतिशय मानाच्या कुटुंबातल्या. त्यामुळे जयंत नारळीकर यांचे आजोळही कोल्हापुरातच. वडील विष्णू नारळीकर हे गणित तज्ञ आणि रँगलर ही पदवी घेतलेले. ते उच्च शिक्षणासाठी बनारसला गेले आणि त्यामुळेच जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षणही बनारसमधूनच सुरू झाले.
कोल्हापूरला अनेक खूप चांगल्या चांगल्या अशा परंपरा आहेत. त्यापैकी शिक्षणाच्या परंपरेत विष्णू नारळीकर आणि त्यांचे चिरंजीव जयंत नारळीकर यांनी कोल्हापूरचे नाव नेहमी उंचावत ठेवले आणि ‘मी कोल्हापूरचा’ हे ते प्रत्येक समारंभात अभिमानाने सांगत राहिले. महाद्वार रोडवरील दोन मजली घर म्हणजे महाद्वार रोडचे एक वेगळेपण म्हणून ओळखले जाऊ लागले. पण तो काळ सोडता नव्या पिढीपर्यंत ही ओळख ताकदीने पोहोचली नाही. त्यामुळे ‘नारळीकर कोल्हापूरचे’ एवढीच त्यांची मर्यादित ओळख झाली. त्याची ओळख नंतर-नंतर नारळीकर व्यापार संकुल अशीच राहिली. राजर्षी शाहू पुरस्कार ‘पद्मभूषण’ पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, रॅंगलर एवढेच नव्हे तर शिक्षणात ज्या ज्या सर्वोच्च पदव्या आहेत, त्या त्या नारळीकरांनी आपल्या अभ्यासावर मिळवल्या. पण महाद्वार रोडवरच्या या नारळीकरांच्या घरावर ‘विष्णू नारळीकर आणि खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर रहात होते, असा सन्मान फलक लावण्याचेही कोल्हापुरात कोणाला आजअखेर सुचलेले नाही.
जयंत नारळीकर वर्षातून एकदा कोल्हापुरात सहकुटुंब यायचे. त्यांच्या स्नेह्यांना, मित्र परिवाराला भेटायचे. शिक्षण, विज्ञान, संशोधन क्षेत्रातील लोक आवर्जून त्यांना भेटायला यायचे. अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवासंदर्भातल्या खगोलशास्त्राrय माहितीसाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले जायचे.
जयंत नारळीकर यांचे शिक्षण, संशोधन, नोकरी कोल्हापूरच्या बाहेर झाली असली तरी कोल्हापूरशी असलेली त्यांची नाळ कधीच सुटली नाही. ते वर्षातून एकदा सहकुटुंब कोल्हापूरला यायचे. त्यांच्या राहण्याची सोय इतर कोठेही होऊ शकत होती. सर्किट हाऊसमधला व्हीआयपी सूट तर त्यांच्यासाठी कायम राखीव होता. पण नारळीकर परिवार महाद्वार रोडवरील आपल्या जुन्या नारळीकर भवनमध्येच रहात होते. त्यांचे भाचे श्रीकांत खंडकर त्यांचा पाहुणचार करत होते.
नारळीकरांना या घराची मिळालेली जागा म्हणजे राजर्षी शाहू महाराजांना उच्च शिक्षण किंवा संशोधनात मोठे काम करणाऱ्यांच्या बद्दल किती आदर होता, याचे एक वास्तव उदाहरण आहे. जयंत नारळीकरांचे वडील विष्णू यांनी गणितातली रंग ही पदवी प्राप्त केली होती आणि अशा उच्चविद्याविभूषितांचा गौरव म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी सनदेच्या स्वरूपात त्यांच्या घरासाठी ही जागा दिली होती. जयंत नारळीकर यांनी रँग्लर हा बहुमान मिळवल्यानंतर शिवाजी विद्यापीठाने त्यांचा नागरी सत्कार केला. त्यानंतरही कोल्हापूरकरांनी नारळीकरांना खूप मान सन्मान दिला. राजर्षी शाहू पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले.
जयंत नारळीकर कोल्हापूरचे असे म्हणत असलो तरी त्याआधी त्यांचे मूळ नातेवाईक भुदरगड तालुक्यातील पाटगावचे. नारळीकरांच्या आई या कोल्हापुरातल्या भेंडे गल्लीत हुजूर बाजार यांच्या घराण्यातल्या. त्यामुळे नारळीकरांचे घर महाव्दार रोडवर. आणि मामाचे घर शिवाजी चौकाजवळच्या भेंडे गल्लीत. त्यामुळे नारळीकर यांचे कोल्हापूरची अगदी जवळचे असे नाते राहिले.