महाद्वार रोड परिसर दोन दिवसांपासून होता अंधारात
नागरिकांची गैरसोय : ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती केल्याने समाधान
बेळगाव : महाद्वार रोड, संभाजी उद्याननजीक बसवलेला ट्रान्स्फॉर्मर काही वेळातच कोसळल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. यामुळे महाद्वार रोड, संभाजी गल्ली परिसरात शनिवारी सकाळपासून रविवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. दिवसभर लाईट नसल्याने नागरिकांचे पुरते हाल झाले. यामुळे नागरिकांनी हेस्कॉम कार्यालयात फोन करून आपला संताप व्यक्त केला. शहराच्या बऱ्याचशा भागात जुने ट्रान्स्फॉर्मर हटवून त्याठिकाणी नवे स्पनपोल बसविले जात आहेत. एकाच काँक्रीट खांबावर लहान ट्रान्स्फॉर्मर बसविल्याने विजेच्या समस्या कमी होणार आहेत. यासाठीच महाद्वार रोड संभाजी उद्यानसमोरील जुना ट्रान्स्फॉर्मर काढून याठिकाणी स्पनपोल घालण्याचे काम सुरू होते. शनिवारी सकाळपासून या कामाला सुरुवात होणार असल्याने परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
हेस्कॉमचा अनागोंदी कारभार
ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आल्यानंतर समतोल न झाल्याने काही वेळातच ट्रान्स्फॉर्मर कलंडला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी हेस्कॉमचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणीही परिसरातील नागरिकांनी अधिकारी वर्गाकडे केली.
वीजपुरवठा सुरळीत केल्याने नागरिकांतून समाधान
शनिवारी सकाळपासून रविवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. हेस्कॉकडून इतर ठिकाणाहून वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो अर्ध्या भागापुरताच वीजपुरवठा होता. त्यामुळे अर्धा भाग शनिवारी रात्रभर अंधारात होता. रविवारी सकाळी पुन्हा ट्रान्स्फॉर्मर बसविणार असल्याने वीजपुरवठा बंद होता. दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.