For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गांधीनगरात महाडिक गटाला खिंडार ! सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

03:56 PM Aug 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
गांधीनगरात महाडिक गटाला खिंडार   सरपंच  ग्रामपंचायत सदस्य व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
Satej Patil Gandhinagar Sarpanch Gram Panchayat
Advertisement

उचगाव/वार्ताहर

गांधीनगर (ता. करवीर) येथील लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हेगडे,युवाशक्तीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी, राजू चंदनशिवे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.यामुळे गांधीनगरात महाडिक गटाला खिंडार पडले.

Advertisement

विधानपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधीनगर सिंधी सेंट्रल पंचायत या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमावेळी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करत त्यांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, सत्ता असताना अनेकजण प्रवेश करत असतात. मात्र सता नसतानाही कोणतीही अपेक्षा न ठेवता गांधीनगरच्या सरपंच आणि सदस्य यांनी केलेला प्रवेश हा कौतुकास्पद असल्याचे सांगितले. काहीजण तुमच्यावर दबाव आणतील. मात्र काळजी करू नका. लागेल ती ताकत आणि मदत करू,सर्वांनी एक चांगला निर्णय घेत अन्याय आणि अविश्वासाच्या वातावरणाला फाटा देत विश्वासाच्या वातावरणात पदार्पण केलंय. सामान्य माणसांमुळेच आज बंटी पाटील जिवंत आहे. आजपर्यंत एक माणूस आम्हाला कधी सोडून गेला नाही. सत्ता नसतानाही लोक आमच्या गटात सहभागी होत आहेत, याचं विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं. लवकरच आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नानं एक कोटी वीस लाखांचा निधी गांधीनगरला प्राप्त होईल, गोरगरिबांची कामे झाली पाहिजेत. सामान्य माणसाला आधार मिळाला पाहिजे, ही आमच्या कामाची पद्धत आहे. यापुढे ही लोकांच्या आशेला पूरक असं काम करू.आमदार ऋतुराज पाटील यांनी आजपर्यंत गांधीनगरच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे. सातत्यानं कामाचा पाठपुरावा केला आहे. यापुढेही गांधीनगरच्या विकासासाठी कटिबद्ध राहू.

Advertisement

आमदार ऋतुराज पाटील यांनी, पक्षप्रवेश करणाऱ्या सगळ्यांचे स्वागत करत, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष कशी वाढवता येईल ही आमच्या कामाची पद्धत आहे. आम्ही गट तट न मानता विकास कामाला महत्त्व देतो. आज पक्ष प्रवेश करणाऱ्यांनी मागील १८ वर्षे कटू अनुभव घेतला आहे, यापुढे त्यांना अभिमान वाटेल असा अनुभव येईल. यापुढे गावचा विकास कसा करता येईल यावर भर देण्यात येईल.गांधीनगर रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबण्यासाठी पुढाकार घेऊ.
लोकनियुक्त सरपंच संदीप पाटोळे यांनी, गावच्या विकासासाठी सरकारी दरबारी, पक्षाच्या नेतेमंडळी यांच्याकडे अनेक फेऱ्या मारल्या, मात्र कामं झालं नाही. पण हे सगळे प्रश्न अजिंक्यतारावर सुटले. त्यामुळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आज काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचा अभिमान वाटत असल्याचं सागितलं.

सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी यांनी, आमच्या आधीच्या गटातील सदस्यांनी सरपंचांना त्रास दिला. यातून आधीच्या नेत्यांनी कोणताही मार्ग काढला नाही. अजिंक्यतारा हे मंदिर आहे, तिथे जाणारा माणूस कधी रिकाम्या हाताने परत आला नाही. याची जाणीव आम्हाला झाल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले.

यासह गजेंद्र हेगडे, निवास तामगावे, कपिल घाडगे, प्रल्हाद शिरोटे, आशिष पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक ,सूत्रसंचालन व आभार उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी केले.

यावेळी सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गोवालदास कटार, होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक तेहल्यानी, उपाध्यक्ष सेवाराम तलरेजा, उपसरपंच विनोद हजुराणी, ग्रामपंचायत सदस्य रियाज सनदी, उचगाव सरपंच मधुकर चव्हाण,करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, सनी चंदवाणी,रिटेलचे अध्यक्ष दिलीप कुकरेजा, विलास मोहिते,माजी उपसरपंच गुड्डू सचदेव, प्रकाश चंदवानी, कपिल घाडगे,धीरूभाई टेहल्याणी, प्रताप चंदवानी, विशाल पहूजा,बजरंग रणदिवे यांच्यासह गांधीनगर पंचक्रोशीतील ग्रामपंचायत पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी तरुण मंडळाचे कार्यकर्ते, बचत गटातील महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.