सावकर म्हणाले, 'आप्पा कशाला बुके?', महाडिक-कोरे यांच्यात बंद दाराआड चर्चा
आप्पांच्या हातातील बुके पाहून सावकरांनी आप्पा कशाला बुके अशी गुगली टाकली. यावर आप्पा म्हणाले, कायमच बुके घेवून यावे लागणार आहे.
वारणानगर : गुरुवारी दुपारच्या वेळी अचानक जिह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक वारणेतील जनसंपर्क कार्यालयात माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या समोर येत त्यांनी त्यांचे बुके देवून स्वागत केले. आप्पांच्या हातातील बुके पाहून सावकरांनी आप्पा कशाला बुके अशी गुगली टाकली. यावर आप्पांनी देखील तत्परता दाखवत, यापुढे कायमच बुके घेवून यावे लागणार, असे उत्तर दिले. त्यामुळे भारावलेल्या वातावरणात चर्चेला सुरुवात झाली.
माजी आमदार महादेवराव महाडिक यांना जिह्यात एकाकी पाडायचा प्रयत्न सुरू झाला. याचा एक भाग गोकुळची सत्ता हातात घेण्यासाठी झाला. आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी खा. संजय मंडलिक, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांसह सर्वांची मोट बांधून गोकुळमध्ये सत्तांतर केले. त्याचा फार्म्यूला देखील ठरला आहे. त्यामुळे सत्तेची नवी राजकीय घडी बसवणे शक्य आहे का ? याची चाचपणी सुरू आहे.
माजी मंत्री आमदार डॉ. विनय कोरे यांनी स्थानिक राजकारणात सर्वांसोबत म्हणजे महाआघाडी सोबत त्यामध्ये जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समावेश आहे. परंतु पूर्वी महाविकास आघाडीत असणारे मंत्री मुश्रीफ माजी खासदार संजय मंडलिक, मंत्री प्रकाश आबिटकर, संजयबाबा घाटगे असे महायुतीत दाखल झाल्याने सतेज पाटील यांच्या महाविकास आघाडी सोबत कोण ? आसा प्रश्न निर्माण होतो आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सूर धरलातर गोकुळची चेअरमन निवड लक्षवेधी ठरेल. तर पाच वर्षाचा आघाडीचा ठरलेला फार्म्युला कायम राहिलातर या निव्वळ चर्चाच ठरतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ संदर्भात ठोस भूमिका घेतल्यास आमदार विनय कोरे तसेच भाजपाची भूमिका महत्वाची ठरेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवर मंत्री मुश्रीफ यांची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर मंत्री आबीटकर, माजी खा. संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके यांची भूमिका ठरेल. त्यामुळे गोकुळचे सत्तांतर करायचे झाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात देखील एकमत झाले तरच सत्तांतर शक्य होणार आहे.
भाजपायुतीत त्यावेळी फडणवीस शिंदे एकत्र असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोकुळ मधील सत्ता परिवर्तन करायचे होते. तेवढ्यात अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाली. त्यामुळे सत्ता परिवर्तनाचा खेळ थांबला. याचवेळी सतेज पाटील गटाकडील गोकुळचे अध्यक्षपद मंत्री मुश्रीफ गटाकडे आले. आता निवडणुकीला एक वर्ष राहिले आहे. सर्व काही सुरळीत चालले आहे.
बंद दाराआड काय घडले....
गोकुळ मध्ये येत्या महिन्यात नवीन चेअरमन बदलाचे वारे सुरु आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाची सत्ता देखील महायुतीची व्हावी असा सूर उमटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी भेटून गुप्त चर्चा केली आहे, असा कयास राजकीय विश्लेषक लावू लागले आहेत. अन्य विषयावर देखील चर्चा झाल्याचे समजते परंतु बंद दाराआड झालेल्या चर्चेचा सूर बाहेर पडलेला नाही. यावेळी छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील उपस्थित होते.