Mahadevi Elephant Nandani: महादेवीसाठी पदयात्रा 45 किलोमीटरची, कर्नाटक नागरिकांचाही सहभाग
मूक मोर्चात उत्तर कर्नाटकातील नागरिक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले
इचलकरंजी : नांदणी येथील महादेवी हत्तीला परत पाठवा, या मागणीसाठी रविवारी नांदणी ते कोल्हापूर अशी पदयात्रा निघाली, या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदयात्रेतील तब्बल आठ किलोमीटरची रांग कोल्हापूर-सांगली महामार्गावर लक्षवेधी ठरली. महाराष्ट्रातील विविध भागासह उत्तर कर्नाटकातील नागरिक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले.
विशेष म्हणजे सर्व जाती, धर्म, संघटनांनी उत्स्फूर्तपणे या 45 किलोमीटरच्या पदयात्रेत सहभाग नोंदवला. शिरोळ तालुक्यातील नोंदणी येथील मठातील महादेवी हत्तीणीला परत पाठवा, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात लढा कोल्हापूर आणि सांगली जिह्यात सुरू झाला आहे.
या लढ्याची व्याप्ती आता वाढू लागली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत राज्य, केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच राष्ट्रपतींना देण्यात येणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यासाठी रविवारी 45 किलोमीटरची पदयात्रा जाहीर केली होती.
दरम्यान, रविवारी पहाटे तीन वाजल्यापासूनच नांदणी येथे महाराष्ट्रातील विविध भागातून नागरिक जमा होऊ लागले होते. पहाटे साडेपाच वाजता श्रवणबेळगोळ मठाचे चारूकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, नांदणीचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत या पदयात्रेला प्रारंभ झाला. ज्या ठिकाणाहून महादेवी हत्तीणीला ‘वनतारा“ला नेण्यासाठी ट्रकमध्ये घालण्यात आले. त्याच निषिदिका ठिकाणापासून पदयात्रेला सुरुवात झाली.
माजी खासदार शेट्टी यांनी सर्वांना ही पदयात्रा शांततेमुळे व अहिंसामय मार्गाने नेण्याचे आहे. त्यामुळे कोणीही कोणताही अनुचित प्रकार करू नये, असे आवाहन केले. त्यानंतर ही पदयात्रा मार्गस्थ झाली. पदयात्रेत महिला आणि मुलांचाही सहभाग लक्षणीय होता. सांगली-कोल्हापूर मार्गावर अनेक गावाच्या ठिकाणी वेगवेगळे फलक लावले होते. आमचा हत्ती परत द्या, माधुरी परत आलीच पाहिजे, यासह अनेक फलक घेतलेले नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.
पदयात्रेत सहभागी बहुतांशी जणांनी टोप्या घातल्या होत्या. यामध्ये एका बाजूस बायकॉट जिओ तर दुसऱ्या बाजूस माधुरी हत्ती परत आलाच पाहिजे, असा संदेश होता. मार्गावर अनेक ठिकाणी चहा, नाष्टा आणि पाण्याची व्यवस्था नागरिकांनी केली होती. निमशिरगाव तमदलगे, हातकणंगले, रामलिंग फाटा मार्गे ही रॅली दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चोकाक येथील विशाल मंडप कार्यालय येथे पोहोचली. येथे पदयात्रेत सहभागी नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.
पदयात्रेत महाराष्ट्रातील विविध भागातून नागरिक आले होते. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यातील नागरिकांसह पैठण, बारामती, अकलूज, कर्नाटकातील विजापूर, बागलकोट बेळगाव आदी भागातील नागरिकांचा सहभाग होता. नऊ-दहा वर्षांच्या मुलापासून ते ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे पदयात्रेत सहभागी झाल.
हत्ती परत मिळालाच पाहिजे, याबाबत प्रत्येकाच्या मनात तीव्र भावना होत्या आणि हे पदयात्रेतून दिसून येत होते. दुपारी एक वाजता चोकाक येथून ही पदयात्रा कोल्हापूरकडे रवाना झाली. अनेक गावातील नागरिक रॅलीमध्ये चोकाक येथून ही सहभागी झाले. त्यामुळे या रॅलीची व्याप्ती अधिकच वाढत गेली हेरले, हालोंडी, शिरोलीसह विविध ठिकाणी पाणी सरबत व नाश्त्याची सोय केली होती.
तब्बल 8 किलोमीटरची रांग
नांदणीतून पहाटे निघालेली ही पदयात्रा सकाळी कोल्हापूर-सांगली मार्गावर होती. दुपारी शिरोलीपर्यंत ही पदयात्रा शिस्तबद्ध रितीने पोहोचली. यावेळी तब्बल आठ किलोमीटरची रांग कोल्हापूर-सांगली मार्गावर लागली होती.