For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mahadevi Elephant Nandini: महादेवीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार, मंत्रालयात बैठक

01:41 PM Aug 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
mahadevi elephant nandini  महादेवीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार  मंत्रालयात बैठक
Advertisement

महादेवीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गुजरातमधील वनतारामध्ये नेलंय

Advertisement

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी, अशी जनभावना आहे. यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल. नांदणी मठानेही स्वतंत्र याचिका दाखल करावी, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महादेवी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गुजरातमधील वनतारामध्ये नेण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकातून यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement

आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महादेवीला परत नांदणीत आणावे या मागणीसाठी दोन लाखांहून अधिक सह्यांचे पत्र राष्ट्रपतींना पाठविले. दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर 45 किलोमीटर विराट मूक पदयात्रा काढण्यात आली. याची घेतली आहे.

दखल राज्य सरकारने बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नांदणी मठाच्या परंपरा आणि जनतेच्या भावनांचा विचार करून कायदेशीर मार्गाने महादेवी हत्तीणीला पुन्हा मठात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गेल्या ३४ वर्षांपासून महादेवी हतीण नांदणी मठात आहे. ती पुन्हा मठात यावी ही जनभावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल.

मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य सरकारचाही समावेश करावा. तसेच वनविभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र भूमिका मांडण्यात येईल. यामध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषाप्रमाणे व उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व मुद्यांचे निराकरण करण्यात येईल.

महादेवीसह महाराष्ट्रातील इतरही हत्ती बाहेर नेण्यात आले, अशा सर्व हत्तींची माहिती वनविभागाने गोळा करावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यावेळी उपस्थित कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन हतीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.

खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अशोकराव माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदींसह जैन स्वामी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते

हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांसह पथक

हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक पथक तयार करून आवश्यक ती सर्व मदत करेल, आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी व्यवस्थाही करण्यात येईल. त्याप्रमाणे सुविधा देण्यात येतील. आदी बाबींचा समावेश करून या बाबी तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही राज्य शासनामार्फत या याचिकेमध्ये करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.