ओटवणे येथील महादेव मयेकर यांचे निधन
ओटवणे : प्रतिनिधी
ओटवणे शेरवाळेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सुतार कारागीर महादेव उर्फ जिजी अनंत मयेकर (७४) यांचे मंगळवारी सकाळी गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनाचा मयेकर कुटुंबीयांसह मित्रपरिवाराला धक्काच बसला.जिजी मयेकर रविवारी दुपारी आंब्याच्या झाडावरून पडून त्यांच्या डोक्यासह पाठ, मणके व बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना सुरुवातीला सावंतवाडीत खाजगी रुग्णालयात त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबुळी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. जिजी मयेकर शेरवाळेवाडी येथील शेष साक्षात्कार सेवा समितीचे पदाधिकारी होते. धार्मिक व सामाजिक कार्य त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. तसेच रवळनाथ वाचनालय आणि सार्वजनिक नवरात्रोत्सव समितीचेही ते पदाधिकारी होते. त्यांचे पार्थिव सायंकाळी गावात आणल्यानंतर ओटवणेवासियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत मयेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील उमेश मयेकर आणि कृष्णकांत (बंड्या) मयेकर यांचे ते वडील तर सुनिल मयेकर यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, भाऊ भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.