महाड गोवंश हत्या व गोरक्षकांना मारहाण प्रकरणी आ. नितेश राणे यांची चौकशीची मागणी
डी.वाय.एस.पी. यांसह पोलीस प्रशासनाला धरले धारेवर!
रायगड / प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात इसाने कांबळे येथे मंगळवार १८ जून रोजी झालेल्या गोवंश हत्या व गोरक्षकांना मारहाण प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी चौकशीची मागणी केली आहे. सुमारे ३०/४० कार्यकर्त्यांसह त्यांनी बुधवारी रात्री उशिरा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याला भेट दिली आणि महाडचे डी वाय एस पी शंकर काळे यांसह पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
देशात आणि राज्यात गोवंश हत्येचा कायदा असताना हा कायदा मोडायची हिम्मत तुमच्या विभागात होतेच कशी ? आणि त्यांना विरोध आणि मज्जाव करणाऱ्या, पोलिसांना मदत करणाऱ्या गोरक्षकांवर हल्ला होतो, पोलिसांना देखील धक्काबुक्की होते, एवढी हिम्मत यांच्यात कोणाच्या पाठिंब्यामुळे येते ? या जिहादी कृत्य करणाऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असे अनेक खडे सवाल उपस्थित करीत आ.नितेश राणे यांनी डीवायएसपी काळे यांना चांगलेच फैलावर घेतले.
आ. राणे पुढे म्हणाले. गोरक्षकांवर हल्ला करणारा जमाव हा ५०/६० जणांचा होता असे उपस्थित कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे ,परंतु पोलिसांनी फक्त पाच आरोपींना ताब्यात घेऊन इतर दहा ते पंधरा जणांवरच गुन्हा दाखल केला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींवर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
हा देश हे राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान आणि कायद्यावर चालते जर कोणाला इथे शरीयत कायदा लागू करायचा असेल तर त्यांचा बंदोबस्त करण्याची हिम्मत आमच्यामध्ये आहे.
आम्ही संविधान मानणारे आहोत परंतु आम्ही संयम बाळगतो याचा कोणी गैरअर्थ काढू नये, जशास तसे आणि आरेला कारे करण्याची हिम्मत आमच्यामध्ये आहे आणि यापुढे महाड तालुक्यातील अवैध कत्तलखाने, गौवंशहत्या ताबडतोब बंद झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ते बंद करू असा सज्जड दम देखील त्यांनी यावेळी दिला.
तसेच मुख्यमंत्री,गृहमंत्री यांच्याशी या विषयावर चर्चा करून येणाऱ्या अधिवेशनात निश्चितपणाने हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
डी वाय एस पी काळे यांनी या घटनेबाबत गुन्हेगारांना कायद्याचे कठोर शासन नक्कीच मिळेल, पोलीस आपले काम करीत आहेत आणि कोणत्याही आरोपींना, गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही असे आश्वासन यावेळी नितेश राणे यांना दिले. यानंतर नितेश राणे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधून ग्रामीण रुग्णालय महाड येथे जाऊन या घटनेतील जखमी गोरक्षक दिनेश दरेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा सकल हिंदू समाजा तर्फे शनिवार २२ जून रोजी सकाळी ११ वाजता महाड शहरात निषेध मोर्चाचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचे एक पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असून तशी हँडबिल देखील जनतेमध्ये वाटली जात आहेत.
अशाच स्वरूपाची घटना महाड तालुक्यातील राजेवाडी, वर येथे काही कालावधीपूर्वी घडली होती आणि त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्यामुळे याचे तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यासह राज्यभर पसरले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळू नये आणि सर्वत्र शांतता प्रस्थापित राहावी या दृष्टीने पोलिसांनी यावर ठोस कारवाई करणे सध्याच्या घडीला अपेक्षित आहे जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीची कोणतीही घटना व अनुचित प्रकार तालुक्यात घडणार नाही अशी भावना जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.