For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाकुंभवरील महाभारत: मोदींचा वारसदार कोण?

06:25 AM Mar 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाकुंभवरील महाभारत  मोदींचा वारसदार कोण
Advertisement

144 वर्षानंतर आलेला महाकुंभ पार पडला. श्रद्धा आणि भक्तीचा महासागर प्रयागराजला लोटला आणि जगातील सर्वात प्रचंड असा धार्मिक उत्सव भारतात बिनबोभाट साजरा करण्याचे श्रेय सत्ताधारी स्वत:कडे घेऊन आपली पाठ थोपटू लागले. देशाच्या जवळजवळ प्रत्येक राज्यातून भाविक तिथे आले. कोठून हजारो आले असतील तर कोठून लाखो तर कोठून कोट्यावधीदेखील. अवघी दुमदुमली प्रयागराजनगरी हे अगदी खरे.

Advertisement

पुढील निवडणूकांच्या अगोदर आपली हिंदुत्वाची मतपेढी घट्ट करण्याचा मार्ग त्यांनी महाकुंभाचे यशस्वी संचालन करून प्रशस्त केला असे त्यांना वाटू लागले आहे. अदानी, अंबानींसह सर्व क्षेत्रातील लहानथोर मंडळीनी महाकुंभ महोत्सवात गंगेत डुबकी घेऊन आपले पाप धुवून काढले. किती लोक प्रत्यक्षात तिथे आले याविषयी देखील बरीच उलटसुलट चर्चा सुरु आहे. कोणी म्हणतंय की 66 कोटी लोक तिथे लोटले तर कोणी रेल्वेचेच प्रसिद्धी पत्रक दाखवून त्यांनी पाच कोटी लोकांची येण्याजाण्याची व्यवस्था केली त्याशी हे विसंगत आहे असे सांगत आहेत. तात्पर्य काय तर जास्तीतजास्त लोकांना महाकुंभला गेल्याचे सांगून आपण हिंदूंना कसे ‘जागे’ केले आहे असे दावे होत आहेत.

कोणाला आवडो अथवा नावडो, पण केंद्रात सत्तेत आल्यापासून अशा आयोजनातून ‘इव्हेंट मॅनजमेंट’ कसे करायचे याचे एक चपखल शास्त्रच भाजपने जणू बनवले आहे. ते इतक्या बेमालूमपणे वापरले जात आहे की उद्योगक्षेत्रातील दिग्गज असोत तसेच अक्षयकुमार आदी सरकारधार्जिणे कलाकार त्यात सहभाग घेऊन योग्य तो संदेश योग्य त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. जाहिरातींवर अवलंबून असलेली प्रसारमाध्यमेदेखील त्यात हात धूऊन घेत स्वत:चं चांगभले करतात. हिंदुत्वाचे नाणे कसे खणखणीत आहे हे कधीकधी ‘मूर्तीभंजक’ औरंगजेबाच्या वादावरून दाखवले जाते तर कधी ‘छावा’ चित्रपटावरून. थोडक्यात काय तर आपला देश बदलत आहे.

Advertisement

देश बदलला आहे की नाही ही वेगळी गोष्ट आहे. राजकारण मात्र पार बदललेले आहे. 1996साली भाजपच्या नेतृत्वाखाली असलेले अटल बिहारी वाजपेयी सरकार हे केवळ 13 दिवस चालले होते तर आता नरेंद्र मोदींच्या अधिपत्याखालील सरकार दोन वर्षात 13 वर्षे पार करेल. इतकेच नव्हे तर 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याची शंभरी साजरी करेल तेव्हादेखील सत्तेत आपणच असू असा विश्वास राज्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यात किती खरे आणि किती खोटे ते येणारा काळ दाखवेल. पण या बदलत असलेल्या वातावरणात भाजप अंतर्गत देखील एक सुप्त स्पर्धा सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यात संसदेत पंतप्रधानांनी अचानकपणे महाकुंभाच्या आयोजनाविषयी भाषण केले त्याचा अर्थ राजकीय क्षेत्रात वेगवेगळा लावला जात आहे. मोदी विश्वगुरू झाले असताना योगी आदित्यनाथ हे हिंदू ह्रदय सम्राट झाले आहेत असे दाखवले जात असताना पंतप्रधानांनी संसदेत हे भाषण करून सत्ताधाऱ्यांमधील एक सुप्त स्पर्धा दाखवली आहे. या भाषणानंतर राहुल गांधी यांच्यासह कोणाही विरोधकाला बोलू न देऊन सरकारने अशा धारणेला जणू खतपाणीच घातलेले आहे.

येत्या सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी यांना 75 पूर्ण होत असताना त्यांचा उत्तराधिकारी कोण? याबाबत प्रत्येक थोर नेता आपल्या सोंगट्या अलगदपणे पुढे सरकवत आहे. महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाचा दावा करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एकीकडे स्वत:च घोडे पुढे दामटत आहेत तर मोदींचे उजवे हात मानले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ‘अरे दिवानो मुझे पहचानो’ असा संदेश देत आहेत. मध्यप्रदेशमधील सर्व लोकसभा जागा भाजपकरता जिंकून शिवराज सिंग चौहान हे स्वत:ला या स्पर्धेत महत्त्वाचा दावेदार मानतात तर महाराष्ट्रातील दैदीप्यमान विजयाने देवेंद्र फडणवीस हे कळत नकळत या वरच्या श्रेणीत येऊन बसलेत. मोदीनंतर सध्यातरी जहाल हिंदुत्ववाद्यांचे मुकुटमणी हे योगीच आहेत याबाबत कोणात दुमत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजप हरण्याचे एक कारण योगी नाराज होते आणि त्यांनी खेळ केला असेही मानले जाते.

एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत योगींना विचारले गेले की उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचे कार्य झाल्यावर तुम्ही दिल्लीलाच जाणार हे बरोबर आहे ना त्याला त्यांचे उत्तर असे की एकदा लखनौ येथील कार्य पार पडले की मी परत गोरखपूरला जायला रिकामा होईन. तेथील गोरखनाथ पीठाचे ते प्रमुख महंत आहेत. ही फक्त सांगण्याची गोष्ट झाली. मी पुढील पंतप्रधान बनणार आहे असे सांगून कोणी आपल्या अडचणी वाढवत नसतो.

अशा नाजूक विषयात आपले नाव उघडपणे पुढे करून आपल्या पायावर आपणच धोंडा पाडून कोणी घेत नसतो. हात दाखवून अवलक्षण कशाला? पंडित नेहरूंच्या तिसऱ्या टर्ममध्ये ‘नेहरूंनंतर कोण?’ अशी चर्चा सुरु झाली होती. विल्लेस हेंगेन या एका विदेशी पत्रकाराने ‘ Atिाr ऱाप्rल्, wप्द?’ असे एक रंजक पुस्तकदेखील लिहिले होते. त्यात संभाव्य उमेदवारांत यशवंतराव चव्हाण, एस के पाटील या महाराष्ट्रातील दोन नेत्यांचे नाव होते तसेच वादग्रस्त कृष्णा मेनन तसेच त्यांच्या जवळचे समजले जाणारे तत्कालीन लष्करी अधिकारी जनरल बी एम कौल यांचीही नावे होती. 1962च्या चीनबरोबरील युद्धापूर्वी हे पुस्तक लिहिले गेले होते. नेहरूंच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांमध्ये त्या पुस्तकात गुलझारीलाल नंदा, मोरारजी देसाई, लालबहादूर शास्त्राr तसेच इंदिरा गांधी यांचीदेखील नावे होती. या प्रत्येक नेत्याचे चांगले तसेच वाईट गुण त्यात दाखवण्यात आले होते.

2009च्या निवडणूकीत भाजपने लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करून वाजपेयींचे तेच ‘लक्ष्मण’ आहेत असे इंगित केले होते. पण त्यावेळी भाजपला दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मोदींच्या उदयाला पोषक वातावरण तयार झाले आणि काँग्रेसला 2014 साली केवळ पराभवच पत्करावा लागला नाही तर 543 सदस्यीय लोकसभेत केवळ 44 वर त्याची गाडी घसरली. पुढील लोकसभा निवडणूक येईल तेव्हा मोदी 80च्या जवळ पोहोचतील आणि अशा वेळी त्यांना परत संधी मिळणार की पक्षातील तरुण नेते पुढे येणार हे तोपर्यंत कशा कशा घटना घडणार यावर अवलंबून राहणार आहे. मोरारजी देसाई हे 80च्या घरात असताना पंतप्रधान झाले असले तरी जनता पक्षातील भांडणांमुळे त्यांना अर्ध्या टर्म मध्येच जावे लागले होते. त्याला लवकरच अर्धशतक होणार आहे.

असे एकीकडे होत असताना भाजप विरोधक मात्र महाकुंभच्या महाचेंगराचेंगरीत हजारो मृत्युमुखी पडले असे आरोप करत यजमानांचे वाभाडे काढत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये राम राज्य आहे असे दावे होत असतानाच भाजपचेच काही आमदार मात्र उलटेच दावे करत आहेत. भाजपचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याचा निर्णय या महिन्यात होणार आहे अशी चर्चा सुरु झालेली आहे. पंतप्रधान येत्या 30 तारखेला नागपूरला भेट देणार असून संघ कार्यालयात जाणार आहेत अशी वृत्ते आहेत. पंतप्रधान झाल्यावर ही पहिलीच संघ कार्यालयाला भेट असल्याने तिचे भलेभले अर्थ लावले जात आहेत. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांना भाजपचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यासाठी संघ आग्रही आहे असे सांगितले जात आहे. पुढील लोकसभा निवडणूक चार वर्षावर असली तरी भाजपचा पुढील चेहरा कोण असावा याबाबत या हालचाली सुरु आहेत असे दावे केले जात आहेत. ते कितपत बरोबर अथवा चूक ते येत्या काळात दिसणार आहे.

हरयाणाचे मुख्यमंत्री राहिलेले आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेले मनोहरलाल खट्टर यांना पुढील राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचे मोदींनी ठरवले आहे असे गेल्या आठवड्यापर्यंत सांगितले जात होते. तात्पर्य काय आपापल्या सोंगट्या बसवण्याची खटपट जोरात सुरु झालेली आहे. हा एवढा महत्त्वाचा विषय असूनदेखील प्रसार माध्यमे मात्र त्याबाबत उदासीनच दिसत आहेत. मोदींना पर्याय नाही, त्यामुळे काय घडायचे आहे ते त्यांच्याच मर्जीने घडेल अशी खूणगाठ त्यांनी बांधलेली आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.