For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘गांधी भारत’नंतर ‘महाभारत’?

06:30 AM Jan 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘गांधी भारत’नंतर ‘महाभारत’
Advertisement

‘गांधी भारत’ कार्यक्रमानंतर हायकमांडची भेट घेण्याचे सतीश जारकीहोळी यांनी ठरवले आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढणार आहे. दोन्ही पक्षातील प्रदेशाध्यक्षांचा बदल करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील दोन नेत्यांनी आघाडी उघडली आहे. रमेश जारकीहोळी यांनी बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरुद्ध उघडपणे दंड थोपटले आहेत.

Advertisement

गेल्या आठवड्यात कर्नाटकातील सहा नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांनी केलेल्या मनधरणीनंतर मुंडगारू लता, वनजाक्षी, सुंदरी, माऱ्याप्पा, जेशा, के. वसंत या सहा जणांनी शरणागती पत्करली आहे. नियमानुसार त्यांना सरकारकडून पॅकेज देण्यात आले आहे. त्यांच्या शरणागतीमुळे कर्नाटकातील नक्षल चळवळ जवळजवळ संपुष्टात आली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी कुदरेमुख राष्ट्रीय उद्यानाला विरोध करण्यासाठी कर्नाटकात नक्षल चळवळ सुरू झाली. या चळवळीला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. माओवादी कार्यकर्त्यांच्या शरणागतीनंतर पोलिसांनी त्यांची शस्त्रsही जप्त केली आहेत. सुरुवातीला चिक्कमंगळूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर शरणागतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार होती. अचानक या कार्यक्रमात बदल करून थेट मुख्यमंत्र्यांसमोर बेंगळूर येथे हे सहा जण शरण आले. गुप्तचर विभागाचे प्रमुख हेमंत निंबाळकर यांची भूमिकाही या प्रक्रियेत महत्त्वाची ठरली. कर्नाटकाच्या नक्षल चळवळीवर शेजारच्या आंध्र व महाराष्ट्रातील नेत्यांचा मोठा प्रभाव होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी या सशस्त्र चळवळीला पाठिंबा दिला नाही. सहा जणांच्या शरणागतीमुळे तूर्त तरी कर्नाटक नक्षलमुक्त झाला आहे.

कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील संघर्ष आणखी वाढला आहे. मकरसंक्रांतीनंतर उत्तरायण पुण्यकाळामध्ये या संघर्षाची धार वाढली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना हटविण्यासाठी भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत. तसेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून डी. के. शिवकुमार यांना बाजूला काढण्यासाठी काँग्रेसमध्ये व्यूहरचना सुरू आहे. या दोन्ही पक्षातील अध्यक्ष हटाव मोहिमेत बेळगाव जिल्ह्यातील नेत्यांचाच पुढाकार आहे. बी. वाय. विजयेंद्र यांना अध्यक्षपदावरून बाजूला करण्यासाठी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी उघडपणे दंड थोपटले आहेत. तर डी. के. शिवकुमार हटावसाठी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसमधील वेगवान राजकीय घडामोडींमुळे सौम्य स्वभावाचे सतीश जारकीहोळी आक्रमक झाले आहेत. एक व्यक्ती एक पद हा नियम लागू करण्यासाठी हायकमांडवर दबाव वाढवण्यात आला आहे. कर्नाटकात गेल्या पंधरवड्यापासून सत्तावाटपाच्या चर्चेने उचल खाल्ल्यानंतर मंत्र्यांच्या जेवणावळी सुरू झाल्या. जेवणावळींआड सुरू असलेल्या राजकीय बैठकांना डी. के. शिवकुमार यांनी हायकमांडकडे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या जेवणावळींना हायकमांडने तूर्त आवर घातला आहे.

Advertisement

मकरसंक्रांतीच्या आधी सोमवार दि. 13 जानेवारी रोजी पक्षाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांच्या उपस्थितीत बेंगळूर येथे काँग्रेस संसदीय पक्ष बैठक झाली. बेळगाव जिल्ह्यातील राजकारणामुळे ही बैठकही वादळी ठरली आहे. सत्तावाटपासंबंधी कोणीही उघडपणे चर्चा करू नये, अशी स्पष्ट ताकीद हायकमांडने केली आहे. रणदीपसिंग सूरजेवाला यांच्या सूचनेनंतरही सत्तावाटपाची चर्चा थांबली नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार समर्थकांमधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवकुमार यांना ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद मिळायलाच हवे, या मतावर शिवकुमार समर्थक ठाम आहेत. सिद्धरामय्या हेच पाच वर्षे मुख्यमंत्री असणार आहेत. सध्या मुख्यमंत्रीपद रिकामे नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याचीही गरज नाही. जर नेतृत्वबदल करायचेच ठरले तर दलिताला मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे. कर्नाटकात नेतृत्वबदल होणार नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात संघर्ष नाही. हे दोघे एकदिलाने सत्ता चालवत आहेत, असे सांगत कर्नाटकात सर्व काही आलबेल आहे, असे सुचवण्याचे प्रयत्न रणदीपसिंग सूरजेवाला यांनी केले असले तरी कर्नाटकातील राजकीय घडामोडी लक्षात घेता सत्तासंघर्ष कमी होईल, असे वाटत नाही.

प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावर सतीश जारकीहोळी यांनी डोळा ठेवला आहे. भविष्यात जर नेतृत्वबदल झालाच तर प्रदेशाध्यक्षपद आपल्या हातात राहिले तर शिवकुमार यांची शक्ती आपोआपच कमी होते, असे यामागचे गणित आहे. पक्ष सत्तेवर आणण्याची कुवत असणाऱ्या व चेहरा असणाऱ्या नेत्याची पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष पदावर एखाद्या नेत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. या घडामोडींपासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अंतर राखले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे स्थगित झालेले गांधी भारत कार्यक्रम 21 जानेवारी रोजी बेळगावात होणार आहेत. या कार्यक्रमांच्या तयारीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीतही बेळगावच्या राजकारणावर वादंग माजले. त्यामुळे हायकमांडला बेळगावची डोकेदुखी वाढली आहे. ‘गांधी भारत’ कार्यक्रमानंतर हायकमांडची भेट घेण्याचे सतीश जारकीहोळी यांनी ठरवले आहे. त्यामुळे संघर्ष वाढणार आहे.दोन्ही पक्षातील प्रदेशाध्यक्षांचा बदल करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील दोन नेत्यांनी आघाडी उघडलीय. रमेश जारकीहोळी यांनी बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरुद्ध उघडपणे दंड थोपटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपण त्यांचे नेतृत्व मानणार नाही, असे अनेक वेळा जाहीरपणे सांगितले आहे. बुधवारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यावरही रमेश यांनी टीका केली. या टीकेनंतर प्रथमच बी. वाय. विजयेंद्र यांनी उघडपणे त्यांना इशारा दिला आहे. येडियुराप्पा यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार रमेश जारकीहोळींना नाही. तुमच्या समस्या असतील तर हायकमांडसमोर त्या मांडा, असा सल्ला देतानाच येडियुराप्पा यांच्याबद्दल बोलताना जीभेवर नियंत्रण असू द्या, तुम्ही अलीकडे पक्षात आला आहात. गावच्या राजकारणामुळेच रमेश जारकीहोळी यांनी युतीची सत्ता पाडली. आता 140 आमदारांचे संख्याबळ असूनही बेळगाव जिल्ह्यातील राजकारणामुळे कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. तुम्ही प्रदेशाध्यक्ष बदलणार की त्यांनाच कायम ठेवणार? हे स्पष्ट करा, अशी मागणी सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्तासंघर्ष थोपवण्यासाठी हायकमांड कोणती भूमिका घेणार, यावर कर्नाटकातील राजकारणाची पुढील दिशा ठरणार आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील सत्तासंघर्षामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या. 2018 मध्ये पक्ष सत्तेवर आल्यानंतर सध्या अशोक गेहलोत मुख्यमंत्री होऊ द्यात, निवडणुका जवळ आल्या की मुख्यमंत्रीपद तुमच्याकडेच येणार, असे आश्वासन हायकमांडने सचिन पायलट यांना दिले होते. या आश्वासनाची पूर्ती झाली नाही. अशोक गेहलोत यांनी सत्ता सोडली नाही तर सचिन पायलट स्वस्थ बसले नाहीत. त्यामुळे शेवटी पक्षाची वाताहत झाली. सध्या कर्नाटकात अशीच परिस्थिती पहायला मिळते आहे.

Advertisement
Tags :

.