महाबळेश्वरच्या पाणी पुरवठ्याचे संकट टळले
महाबळेश्वर :
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कोट्यावधी रूपयांची थकबाकी पालिकेने न भरल्याने २४ तारखेच्या मध्यरात्री पासुन शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा जीवन प्राधिकरणाने पालिकेस दिला होता. पालिकेने याची गंभीर दखल घेवून चालु बील व थकबाकी १५ कोटी पैकी १ कोटी ३६ लाख ९४ हजार ८७१ रूपये प्राधिकरणाकडे जमा केले असुन सध्या तरी महाबळेश्वर शहरावरील पाणी पुरवठ्याचे संकट टळले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडुन महाबळेश्वर पालिकेला पाणी पुरवठा केला जातो. जीवन प्राधिकरणाकडुन दरमहा पाणी पुरवठ्याचे बील दिले जाते. परंतु पालिकेकडुन ते बील जीवन प्राधिकरणाला वेळेवर अदा केले जात नसल्याने पालिकेकडील थकबाकी वाढत जाते. सध्या ही थकबाकी १५ कोटी ३ लाख २७ हजार ३८१ इतकी आहे. वारंवार थकबाकी भरण्याबाबत जीवन प्राधिकरणाकडुन पालिकेला कळविले जाते. परंतु पालिका अशा नोटीसांची दखल घेत नसल्याने काही वेळा जीवन प्राधिकरणाकडुन शहराचा पाणी पुरवठा बंद केला जातो. मागील महिन्यात अशा प्रकारे वारंवार पाणी पुरवठा खंडीत करण्यात आल्याने शहरात जीवन प्राधिकाराच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. अशातच जीवन प्राधिकरणाने पालिकेला निर्वाणीचा इशारा म्हणुन २४ तारखेच्या मध्यरात्री पासुन पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. जीवन प्राधिकरणाने दिलेल्या धमकीची पालिकेने गंभीर दखल घेतली. पालिकेने एप्रिल २४ पासुन ते फेब्रुवारी अखेर पर्यत जीवन प्राधिकरणाच्या चालु बिलांची सर्व थकबाकी असलेली रक्कम १ कोटी ३६ लाख ९४ हजार ८७१ रूपये जीवन प्राधिकरणाकडे जमा केले आहेत. पालिकेचे प्रशासक योगेश पाटील यांनी शहराचा पाणी पुरवठा खंडीत होवु नये यासाठी तातडीने हालचाली करून जीवन प्राधिकरणाची थकबाकीतील काही रक्कम तातडीने जमा केल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडीत होणार होता तो धोका आता टळला आहे.
- महाबळेश्वर पालिकेला सर्वाधिक दराने पाणी
जीवन प्राधिकरण महाराष्ट्रात सर्वत्र पाणी पुरवठ्याच्या योजना राबविते परंतु राज्यातील इतर पाणी पुरवठा योजनांचा दर हजारी पाण्याचा दर पाहता महाबळेश्वर पालिकेला सर्वाधिक दर आकारला जातो. अनेकवेळा ही तफावत दूर करण्याची मागणी केली परंतु जीवन प्राधिकरणाकडुन पालिकेच्या या मागणीला केराची टोपली दाखविते.
- वेण्णा तलावाची मालकी नक्की कोणाची
ब्रिटीश काळापासुन वेण्णातलाव हा पालिकेच्या ताब्यात होता आणि आजही आहे, परंतु अलीकडे धरण आमच्या मालकीचे असल्याचा दावा वन विभागाने केला आहे. याचा अर्थ धरण वन विभागाचे, पाणी पालिकेचे, त्यावर जलसिंचन विभागाने धरण बांधले व जीवन प्राधिकरण धरणातून पाणी उचलून शहरास पाणी परवठा केला जातो.
- महाबळेश्वरकरांच्या मानेवर जीवन प्राधिकरणाची तलवार
सध्या पाणी पुरवठा खंडीत होण्याचा धोका टळला असला तरी काही महीन्यां नंतर पुन्हा थकबाकी वसुलीसाठी जीवन प्राधिकरण शहराचा पाणी पुरवठा खंडीत करणार याचा अर्थ जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा खंडीत करण्याची तलवार कायम महाबळेश्वरकरांच्या मानेवर लटकत राहणार आहे.