महाबळेश्वर-तापोळा रस्ता वाहतुकीसाठी खुला
महाबळेश्वर :
महाबळेश्वर ते तापोळ्याला जोडणारा मुख्य रस्ता काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर भागात झालेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला होता. मोठ्या प्रमाणावर दरडदेखील रस्त्यावरती आली होती. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरड हटवून खचून गेलेला रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. आजअखेर हे काम पूर्ण झाले असून हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त होत आहे.
सध्या महाबळेश्वर भागात पावसाच्या जोरदार सरी बरसत असून मागील महिन्यामध्ये महाबळेश्वर-तापोळा रोडवरील चिखली गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या घाटामध्ये रस्त्यालगत असणाऱ्या डोंगराळ भागात पावसाच्या जोरदार सरींमुळे पाण्याचे मोठे नवीन प्रवाह निर्माण झाल्याने रस्त्यावरील डोंगर भागाचे भूस्खलन होऊन डोंगराचा बराचसा भाग रस्त्यावर आला होता. याचबरोबर रस्तादेखील खचून गेला होता. यामुळे महाबळेश्वर-तापोळा वाहतूक ठप्प झाली होती. तापोळा भागातील लोकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असल्याने स्थानिकांची डोकेदुखी चांगलीच वाढली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावर आलेली दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते. जोरदार बरसणाऱ्या पावसाच्या सरींमुळे रस्ता पूर्ववत करण्याच्या कामांमध्ये अडथळा येत होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आज रस्त्यावरील दरड हटवून खचून गेलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.