महाबळेश्वर पठार अंजन जातीच्या फुलांनी बहरले
महाबळेश्वर / विलास काळे :
दर दोन वर्षांनी फुलणाऱ्या अंजन या वनस्पतीला सध्या बहर आला असून महाबळेश्वर मधील जंगले अंजन फुलांच्या निळ्या जांभळ्या रंगानी नटलेले असल्याचे सुखद चित्र येथे पहावयास मिळत आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये सध्या उन्हाळी हंगामाची चाहूल सुरू झाली आहे. दिवसभर उन्हाचे चटके तर सकाळ आणि संध्याकाळसह रात्री अत्यंत आल्डादायक असे येथील सुंदर वातावरण आहे. उन्हाळी हंगाम हा जरी उन्हाळी चटक्यांसाठी प्रसिद्ध असला तरी या हंगामात अनेक रान वनस्पती फुललेल्या पहावयास मिळतात. जांभुळ, गेळा, अंजन, पीसा, पांगळा वनस्पतींसह करवंद, तोरण, अंबुळकी आदी रान मेव्याची वनस्पती असो सर्वांना या काळात फुलांचा बहर व त्यानंतर फळ येत असल्याने हा कालावधी त्यांच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा असतो. निसर्ग जणू याची वाटच पाहत असतो.
फुले व फुलोऱ्याच्या काळ म्हंटले की परागी वहनासाठी व त्याच बरोबर फुलांतील मधुर गोड व औषधी मध गोळा करण्यासाठी ही मध माश्यांचे या फुलाभोवती लगबग चालू असते. असेच काहीसे चित्र सध्या येथील पठारावर जंगलात पहावयास मिळत आहे. येथील जंगल हे सदा हरित जंगल म्हणून ओळखले जाते. येथे जांभळा ची झाडे मोठ्या प्रमाणात असेल तरी त्याचं बरोबर अंजन, पीसा, गेळा जातीची झाडे ही भरपूर आहेत.
सद्या महाबळेश्वरचे हे पठार दर दोन वर्षांनी फुलण्प्रया अंजनीच्या फुलांनी बहरले आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणारा रस्ता असो वा विविध पर्यटनस्थळांकडे जाणारा रस्ता व जंगल असो सर्व पठारावर आंजनीच्या फुलांना बहर आला आहे. या फुलांच्या निळसर जांभळ्या रंगाच्या झुपकेदार फुलांमुळे निसर्ग प्रेमी वेडा पिसा होत आहे तर मध माश्यांचे त्यातील मध गोळा करण्यासाठी फुलां भोवती पिंगा सुरू आल्याचे मोहक दृश्य ही पाहिला मिळत आहे. अंजन वनस्पतीचे वनस्पती शास्त्रातील नाव मेमेसिलोन अंम्बेलेंटम असे असून त्याची वनस्पती शास्त्रातील फॅमिली मेलास्त्रोमासीई ही आहे. सर्व साधारणपणे फेब्रुवारी, मार्च या कालावधीत निसर्गाचा हा फुलोरा पहावयास मिळत असतो. परिसरातील या वनस्पतीच्या फुलोऱ्यामुळे येथे जंगल भ्रमंती करताना मंद पण वेगळाच सुवास अनुभवयास मिळतो आहे. अंजनीच्या झाडाच्या फांदीवर या फुलांच्या माळा लगटलेल्या दिसत असून ते पाहताना मनाला मोह पहला नाही तरच नवल. महिला जश्या आपल्या केसात विविध फुलांच्या वेण्या घालतात तश्याच सारख्या अंजन जातीची वनस्पती फुलांच्या झुपकेदार निळसर जांभळ्या रंगाच्या वेण्या घालून नटलेली दिसते. या परिसरातील सर्व भागातील जंगलात अश्या प्रकारे अंजनी वनस्पती नटलेली असल्याने व तिच्या भोवती मध गोळा करण्यासाठी मध माशांचा पिंगा चालु असल्याने ते दृश्य पाहण्प्रयाला अत्यंत मनमोहक व सुखद वाटते.