For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार जिल्ह्यात महाशिवरात्री उत्साहात

11:05 AM Feb 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
कारवार जिल्ह्यात महाशिवरात्री उत्साहात
Advertisement

मुर्डेश्वर, सज्जेश्वर, धारेश्वर अन् गुणवंतेश्वर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Advertisement

कारवार : दक्षिण भारतातील काशी, भुकैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुराण प्रसिद्ध श्रीक्षेत्र गोकर्णसह जिल्ह्यातील अनेक शिवालयांमध्ये महाशिवरात्री पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गोकर्ण येथील श्री महाबळेश्वर देवालयातील आत्मलिंगच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रींच्या दर्शनासाठी, अभिषेकसाठी गोकर्णमध्ये दाखल झालेल्या भाविकांमध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील भाविकांचा समावेश होता. गोकर्ण येथील महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाला यापूर्वीच सुरुवात झाली आहे. महाशिवरात्र पर्वाची सांगता 18 तारखेला महारथोत्सवाने होणार आहे. महाशिवरात्र पर्वाचा रविवार मुख्य दिवस असल्याने हजारो भाविक शनिवारीच गोकर्ण येथे दाखल झाले होते. रविवारी पहाटे 2 वाजताच देवदर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

त्यामुळे अगदी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही भाविकांनी पवित्र कोटीतीर्थमध्ये तर अन्य काही भाविकांनी अरबी समुद्रात डुबकी घेऊन पहिल्यांदा द्विभूजी गणपतीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आत्मलिंगाचे दर्शन घेतले. ओम नम: शिवाय, हर हर महादेवसह अन्य घोषणा देत भाविक प्रत्यक्षात आत्मलिंगाला स्पर्श करून दर्शन घेत असल्याचे दिसून येत होते. गेल्या काही वर्षापासून मंदिर प्रशासन कमिटीतर्फे भाविकांना ड्रेस कोड लागू केला आहे. गोकर्ण येथील टॅक्सीचालक आणि मालक संघटनेतर्फे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या सुविधेचा अनेक भाविकांनी लाभ उठविला. दर्शनासाठी गोकर्ण येथे दाखल झालेल्या भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून मंदिर कमिटी, पोलीस खात्याकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

Advertisement

गोकर्ण कथानकाशी जोडल्या गेलेल्या स्थळीही महाशिवरात्र उत्साहात

गोकर्ण येथील कथानकाशी जोडली गेलेली मुर्डेश्वर सज्जेश्वर, धारेश्वर आणि गुणवंतेश्वर ही श्री स्थळेही जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आहेत. या सर्व चार ठिकाणीही महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. केवळ राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील आघाडीचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुर्डेश्वर येथे तर भाविकांचा महापूर लोटला होता. मुर्डेश्वर येथील देव दर्शनासह सर्वात उंच गोपूर ईश्वराची मूर्ती, मंदिर परिसरात साकारलेले भव्य आणि दिव्य मूर्तीरुपी देखावे पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

कवळेश्वरसह अन्य ठिकाणी महाशिवरात्र उत्साहात

जोयडा तालुक्यातील सुप्रसिद्ध कवळेश्वर, माजाळी (ता. कारवार), याण (ता. कुमठा) येथेही महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कवळेश्वर येथील गुहेतील शिवलिंगच्या दर्शनासाठी बेळगाव, धारवाड, कारवार जिल्ह्यातील हजारो युवकांनी धाव घेतली होती. माजाळी येथील सुप्रसिद्ध रामनाथ देवस्थानतर्फे ही महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आत्मलिंगाच्या दर्शनानंतर शिवभक्ताचे निधन

अन्य भाविकांप्रमाणे उत्तर गोव्यातील रत्नाकर बोरकर (वय 72) हे भाविक रविवारी आत्मलिंगाच्या दर्शनासाठी गोकर्ण येथे दाखल झाले होते. रांगेत उभे राहून त्यांनी दर्शनही केले. मंदिराच्या बाहेर प्रसादाच्या रुपाने त्यांनी रुद्राक्षाची माळही खरेदी केली. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. गोकर्णचे सीपीआय श्रीधर यांनी बोरकर यांना तातडीने गोकर्ण येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. तथापि दुर्दैवाने बोरकर यांचा मृत्यू झाला. काही भाविकांनी बोरकर यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली तर अन्य काहींनी त्यांचा महाशिवरात्रीवेळी मृत्यू झाल्याने ते मोक्षाला पात्र ठरले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.