महाकुंभ ‘मेळा’...
जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव अशी ख्याती असलेल्या महाकुंभमेळाव्यास उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुऊवात झाली आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणीसंगमावरील हा उत्सव म्हणजे हा खऱ्या अर्थाने संस्कृती, श्रद्धा आणि परंपरांचा संगम म्हटला पाहिजे. हिंदू धर्मामध्ये कुंभमेळाव्यास अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. दर बारा वर्षांनी भरणारा हा कुंभोत्सव प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन अशा चार ठिकाणी भरत असतो. प्राचिन कथांसह ऐतिहासिक कागदपत्रांमध्येही कुंभमेळ्याचे उल्लेख आढळतात. अमृत मंथनावेळी अमृताचे काही थेंब ज्या चार नगरांमध्ये पडले, तेथे धार्मिक उत्सव होतो, अशा आख्यायिका आहेत. 12 कुंभमेळ्यांचे चक्र पूर्ण झाल्यानंतर महाकुंभमेळा होतो. त्या अर्थी 144 वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळाव्यास विशेष महत्त्व असल्याचे दिसून येते. यंदा पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 13 जानेवारीला प्रारंभ झालेला हा उत्सव 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच तब्बल 45 दिवस सुरू राहणार आहे. या वर्षी 35 ते 40 कोटी भाविक आणि पर्यटक कुंभमेळाव्यास उपस्थित राहण्याची अपेक्षा असून, दोन दिवसांतील गर्दीतून त्याचीच झलक पहायला मिळालेली दिसते. सोमवारी पौषपौर्णिमेनिमित्त पहिले स्नान, तर मंगळवारी दुसरा शाही स्नानविधी पार पडला. पहिल्या दिवशी दीड कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केल्याचे सांगण्यात येते. तर दुसऱ्या दिवशी हा आकडा अडीच कोटींवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल 44 घाटांवर सध्या स्नानाची सुविधा करण्यात आली असून, 20 देशांमधील भाविक सध्या संगमावर एकवटल्याचे दिसून येते. महाकुंभमेळा आणि संत, महंत व नागा साधू हे समीकरणच मानले जाते. यंदाही गंगातीरी महासाधूंचा महासागर उसळल्याची प्रचिती भाविक मंडळी घेत आहेत. जवळपास 13 प्रमुख आखाड्यांचे पीठाधीश, महामंडलेश्वर आणि लक्षावधी नागा साधूंनी यंदा भाग घेतला असून, हर हर महादेव, जय श्री राम आणि जय गंगा मैय्याच्या घोषणेने सध्या हा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार कार्यरत आहे. योगी आदित्यनाथ हे प्राचीन परंपरा आणि संस्कृतीचा कायम पुरस्कार करीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रयागराजमध्ये भरलेल्या या महा कुंभोत्सवाची तितकीच अभूतपूर्व तयारी करण्यात आल्याचे निदर्शनास येते. पंडित नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात म्हणजेच 1954 मध्ये झालेल्या महाकुंभमेळाव्यात प्रयागराजमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये जवळपास 800 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याचे सांगण्यात येते. कुंभमेळाव्यातील भाविकांचा अलोक सागर पाहता अशा दुर्घटना घडण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन योगी यांच्या सरकारने प्रयागराजमध्ये 55 पोलीस ठाणी आणि 45 हजार पोलीस तैनात केले आहेत. केंद्र व राज्याचे प्रशासन, पोलीस कर्मचारी आणि इतर यंत्रणाही हा सोहळा यशस्वीपणे राबविण्यासाठी खपत आहेत. पाणी, वीज, स्वच्छता, भोजन यांसह इतर आवश्यक सुविधा सहजपणे कशा पुरवता येतील आणि भाविकांची गैरसोय कशी टाळता येईल, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. एआय तंत्रज्ञान आणि ड्रोन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही याकामी उपयोग करून घेतला जात असून, यातून उत्सव अधिकाधिक परिपूर्ण होण्यास मदत होईल, असे दिसते. कुंभमेळा म्हणजे आस्था आणि श्रद्धेचे प्रतीक. यातून भक्तीसागराचे जे विराट दर्शन घडते त्याला कोणत्याही शब्दात पकडता येणार नाही. वास्तविक जगाच्या पाठीवरील एकमेव वैविध्यपूर्णता लाभलेला धर्म म्हणजे हिंदू होय. शेकडो पंथ, संप्रदाय असलेल्या हिंदू धर्माचा म्हणून एकमेव ग्रंथ नाही. शेकडो ग्रंथांचा विचारसंचय, त्यातील तत्त्वज्ञान हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्या होय. ज्याला जे ऊचेल, आवडेल आणि ज्यावर ज्याची श्रद्धा जडेल, तो तो त्या त्या संप्रदायाचे पंथाचे अनुकरण करीत असतो. ही लवचिकता आणि विचार स्वातंत्र्य हेच हिंदू धर्माचे शक्तीस्थळ म्हणता येईल. म्हणून अध्यात्माच्या या केंद्रस्थळी आचार विचारांचाही संगम घडत आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. कुंभमेळ्यात अर्थकारणालाही मोठी गती मिळत असते. यंदाच्या मेळ्यात सुमारे दोन लाख कोटी ऊपयांची उलाढाल होण्याचा अंदाज अखिल भारतीय व्यापारी संघटनेने व्यक्त केला आहे. कुंभमेळ्याला साधारण 40 ते 50 कोटी भाविक भेट देतील, ही शक्यता गृहीत धरल्यास यातून व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार, हे नक्की. यामध्ये पर्यटन आणि हॉटेल क्षेत्राचा मोठा वाटा असेल. उत्तर भारत ही धार्मिक स्थळांची पर्वणी मानली जाते. गंगा, यमुनेसारख्या नद्यांच्या सहवासामुळे पवित्र झालेल्या उत्तरेत अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत. महाकुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकडून या तीर्थक्षेत्रांना मोठी पसंती मिळणार, हे वेगळे सांगायला नको. यंदाही अनेक विदेशी नागरिक या सोहळ्याकरिता प्रयागराजमध्ये दाखल झाले असून, त्यांच्या सहभागामुळे खऱ्या अर्थाने कुंभोत्सव ग्लोबल होत असल्याचे दिसून येते. यानंतर 2027 मध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे. महाराष्ट्रातील सरकारनेही केंद्राच्या सहकार्याने वेळोवेळी कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडल्याचे दिसून येते. असे असले, तरी प्रत्येक महाकुंभमेळा हा नवे आव्हान असतो. प्रयागराजच्या कुंभमेळाव्याची भव्यदिव्यता पाहता त्यातूनही बरेच काही शिकण्यासारखे असेल. हे बघता नाशिकमधील कुंभमेळाव्यासाठी हा उत्सव नवी दिशा आणि ऊर्जा देणारा ठरेल, यात शंका नाही. वास्तविक, पुढचे 43 दिवस हे समस्त हिंदू धर्मियांसाठी हे अमृतासारखेच असतील. या अमृतस्नानातून प्रत्येकालाच नवी चेतना मिळेल, हे नि:संदेह.