मगोपचे भाजपा श्रेष्ठींना साकडे
ढवळीकर बंधू दिल्लीत दाखल : बी. एल. संतोष यांच्याशी भेट,वादावर पडदा टाकन्याची विनंती
पणजी : भाजप-मगोप युती प्रकरणी दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये शाब्दिक वाद रंगल्यानंतर तो शमवण्यासाठी मगोतर्फे ढवळीकर बंधूंनी दिल्लीला धाव घेऊन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली आणि युती टिकवण्याचे साकडे त्यांना घातले आहे. दुसऱ्या बाजूने मगो पक्षात घराणेशाही सुरू असून ही परिस्थिती सुधारण्यासाठी बहुजन समाजाच्या नेत्याला पक्षाचे अध्यक्षपद देण्याची मागणीही होत आहे. त्यामुळे सध्या मगो पक्षावर अंतर्बाह्या हल्लाबोल सुरू आहे.
मगो-भाजप युती गोव्यासाठी तसेच दोन्ही पक्षांकरीता महत्त्वाची असून जनतेला देखील युती हवी आहे,असे ढवळीकर बंधूंनी संतोष यांच्या कानावर घातले. जनतेने भाजप-मगो युतीवर विश्वास ठेवला असून ती पुढील निवडणुकीपर्यंत कायम राहावी अशी जनतेसह मगोची इच्छा असल्याचे ढवळीकर यांनी त्यांना सांगितले. मगो-भाजप युती संदर्भात भाजप मंत्री, आमदारांनी कोणतीही वक्तव्ये करु नयेत, असे निर्देश केंद्रातील भाजपने गोव्यातील भाजपला द्यावेत अशी मागणी ढवळीकर बंधूंनी संतोष यांच्याकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजप-मगो युतीमधील वाद चव्हाट्यावर आल्यामुळे भाजपपेक्षा मगोला जरा धक्का बसला असून त्यातून सावरण्यासाठी मगोने आता सारवासारव सुरु केल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच मगोच्या ढवळीकर बंधूंनी गोव्यातील भाजप नेत्यांकडे चर्चा न करता दिल्ली गाठणे पसंत केले आहे. तसेच भाजपच्या उच्च पदाधिकाऱ्यांकडे आपली बाजू मांडण्यासाठी धावाधाव केली. ढवळीकर बंधूंनी युतीचा वाद वाढवण्यापेक्षा तो क्षमवण्याकडे लक्ष केंद्रीत केले असून या वादावर पडदा टाका, अशी विनंती संतोष यांच्याकडे केल्याचे सूत्रांनी नमूद केले. या भेटीचे परिणाम काय होणार ते आता लवकरच दिसून येणार आहे.
भाजप - मगो दरम्यान सर्व काही आलबेल : दामू नाईक
भाजप-मगो या दोन्ही पक्षात तसेच युतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला आहे. मगोतर्फे ढवळीकर बंधू भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस संतोष यांना भेटले त्यात वावगे व चुकीचे असे काहीच नाही. उलट ती चांगली गोष्ट असल्याचे नाईक यांनी नमूद केले. प्रत्येक पक्षाला आपले काम वाढवण्याचा अधिकार आहे. त्याला कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. भाजपमध्ये आलेल्या काहीजणांना पक्षाची शिस्त समजण्यास काही वेळा उशीर लागतो, परंतु शिस्त पाळावीच लागते, असेही ते म्हणाले.
मगोपवर श्रीम्हाळसा,श्रीमहालक्ष्मीचा वरदहस्त : अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचा विश्वास
समजा यदाकदाचित भाजप-मगो युती आगामी काळात तुटलीच तर मगो पक्षाला पुढे नेण्यासाठी नवे नेतृत्व निश्चित लाभेल. कारण या पक्षाला श्रीदेवी म्हाळसा, श्रीमहालक्ष्मीचा वरदहस्त आहे. म्हणूनच तर हा पक्ष विधानसभेत आजही ताठ मानेने उभा आहे, असे निवेदन मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, 1999 मध्ये युती तुटली तेव्हा सुदिन ढवळीकर यांचा मगो पक्षात उदय झाला आणि त्यांनी पक्ष पुढे नेला. आतासुद्धा जर युतीमध्ये खंड पडला तर तसाच एखादा नेता समर्थपणे उभा राहून मगो पक्षाला पुढे नेईल, असा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.
मगो युती प्रामाणिकपणे पाळणार
भाजपचे मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि मगो यांचे संबंध बरे आहेत. मगोने भाजपला कधीच दुखावलेले नाही तसेच युतीचा धर्म पाळलेला आहे. सध्या तरी युतीबाबत भाष्य करण्याची वेळ नाही आणि त्याची गरजही नाही. युती 5 वर्षांसाठी आहे आणि ती मगो पक्ष प्रामाणिकपणे पाळणार असल्याचे ढवळीकर यांनी नमूद केले.
अध्यक्ष होण्यासाठी सहा वर्षे काम करायला हवे
मगोचे काम सात ते आठ मतदारसंघात चालू असल्याचा दावा ढवळीकर यांनी केला आहे. मगो पक्षात अनेक नेते आले आणि गेल.s त्यांचे पुढे काय झाले हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. मगोचे अध्यक्ष होण्यासाठी सहा वर्षे पक्षाचे काम करण्याबरोबरच सदस्य असणे गरजेचे आहे, असा खुलासाही ढवळीकर यांनी केला आहे.