माफिया पवन ठाकूरचे प्रत्यार्पण होणार
नवी दिल्ली
दुबई येथे वास्तव्यास असणारा भारतीय अंमली पदार्थ माफिया पवन ठाकूर याला भारतात आणण्यात येणार आहे. दुबई येथे त्याला अटक करण्यात आली असून त्याचे तेथून भारतात प्रर्त्यार्पण करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. पवन ठाकूर याला अटक झाल्यामुळे एका बहुराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेटचा भांडाफोड झाला असून भारतात अत्यंत महागडे कोकेन पाठविणाऱ्या गँगचाही सफाया झाला आहे. ठाकूर याला भारतात आणल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली जाईल. या चौकशीतून जागतिक ड्रग माफिया आणि त्यांची साखळी यांच्यावर प्रकाश पडेल, असा विश्वास भारताने व्यक्त केला. प्रत्यार्पण त्वरित होणार आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने ठाकूर याच्या नावे इंटरपोल नोटीस काढली होती. नोव्हेंबर 2024 या दिवशी दिल्लीत 82 किलो कोकेन हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर हे कोकेन कोणी पाठविले, याचा शोध घेण्यात आला. तेव्हा या घटनेशी पवन ठाकूर याचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले.