अमेरिकेच्या न्यायालयात मादुरोंनी फेटाळले आरोप
अटकेच्या कारवाईला ठरविले अवैध : विरोधी पक्षनेत्या मारिया लवकरच व्हेनेझुएलात परतणार
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना सोमवारी रात्री न्यूयॉर्कच्या संघीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. स्वत:वर झालेले अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्करीचे आरोप मादुरो यांनी न्यायालयात नाकारले आहेत. मादुरो यांनी स्वत:च्या अटकेला अवैध ठरवत अपहरण झाल्याचा दावा केला. मी गुन्हेगार नसून एक सन्माननीय व्यक्ती आहे आणि अद्याप स्वत:च्या देशाचा अध्यक्ष असल्याचे मादुरो यांनी न्यायालयासमोर म्हटले आहे.
मादुरोंच्या वकिलांनी अमेरिकेच्या कारवाईला सैन्य अपहरण ठरविले. अमेरिकेचे हे कृत्य आंतरराष्ट्रीय कायदा आणि कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करणारे असल्याचा दावाही त्यांनी केला. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 17 मार्च रोजी होणार आहे.
दुसरीकडे व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांनी लवकरच मायदेशी परतणार असल्याची घोषणा केली आहे. अंतरिम अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांना व्हेनेझुएलाच्या जनतेचे समर्थन नाही आणि देशाची जनता आमच्या पक्षासोबत असल्याचा दावा मचाडो यांनी केला.
मादुरोंच्या पत्नीही सुनावणीस हजर
मादुरो यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस देखील न्यायालयासमोर हजर राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. त्यांनी स्वत:ला व्हेनेझुएलाच्या प्रथम महिला संबोधित स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले आहेत. मादुरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अमली पदार्थांचे तस्कर आणि दहशतवादी समुहांसोबत मिळून अमेरिकेत कोकेन पोहोचविण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. मादुरो यांच्यावर मशीनगन बाळगण्याचा आरोप असून याकरता मोठी शिक्षा होऊ शकते. आरोपपत्रात मादुरोंचे पुत्र निकोलस मादुरो गुएरा, गृहमंत्री डियोसडाडो काबेलो आणि कुख्यात टोळी ‘त्रेन दे अरागुआ’चा म्होरक्या हेक्टर गुरेरो फ्लोरेसचे नावही सामील आहे. अमेरिका या टोळीला विदेशी दहशतवादी संघटना मानते.
न्यायालयाबाहेर निदर्शने
मादुरो विरोधातील सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर शेकडो लोक जमा झाले. एकीकडे अमेरिकेच्या कारवाईच्या विरोधात निदर्शने झाली, तर दुसरीकडे मादुरो विरोधी लोकांनी कारवाईच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. सुनावणी संपल्यावर मादुरो बाहेर निघण्यासाठी वळले असता गॅलरीत बसलेल्या एका इसमाने तुम्ही केलेल्या गुन्ह्यांसाठी किंमत मोजावी लागेल असे ऐकविले. याच्या प्रत्युत्तरादाखल मादुरोंनी स्वत:चे स्वातंत्र्य मिळविणार असल्याचे उद्गार काढले.
कराकस येथे गोळीबार
व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये सोमवारी संध्याकाळी अचानक गोळीबार अन् अँटी-एअरक्राफ्ट फायरिंगचा आवाज ऐकू आला. राजधानीत तैनात वेगवेगळ्या सुरक्षा युनिट्समधील गैरसमजामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिराफ्लोरेस अध्यक्षीय भवनानजीक गोळीबार घडल्याचे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. संबंधित भागात संचार करणाऱ्या ड्रोनवर मिराफ्लोरेस पोलीस आणि सुरक्षेत तैनात जवानांनी गोळीबार केला होता असे समजते.