मदरसा शिक्षकाला 187 वर्षांची शिक्षा
मुलीचे लैंगिक शोषण : समाजात राहण्याचा अधिकार नाही
वृत्तसंस्था/ कन्नूर
केरळमध्ये एका मदरसा शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले होते, याप्रकरणी या मदरसा शिक्षकाला 187 वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. ही शिक्षा तालीपरम्बा जलदगती न्यायालयाने ठोठावली आहे. या मदरसा शिक्षकाचे नाव मोहम्मद रफी असून तो 41 वर्षांचा आहे. रफीने कोरोना महामारीदरम्यान 16 वर्षीय विद्यार्थिनीचे दोन वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत लैंगिक शोषण केले होते. अशा गुन्हेगारांना समाजात राहण्याचा कुठलाच अधिकार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायाधीश आर. राजेश यांनी पॉक्सो कायदा आणि भादंविच्या कलमांच्या अंतर्गत मोहम्मद रफीला दोषी ठरविले आणि त्याला 9.10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने मौलाना मोहम्मद रफीला वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे. पॉक्सो कायद्याचे कलम 5 (टी) अंतर्गत त्याला 50 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हे कलम वारंवार लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांवर लागू होते.
भादंविचे कलम 376 (3) अंतर्गत त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर भादंविचे कलम 506 (2) अंतर्गत त्याला 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे कलम गुन्हेगारी धमकीसाठी आहे. पॉक्सो कायद्याच्या कलम 5 (1) आणि 5(एफ) अंतर्गत त्याला 35-35 वर्षांची शिक्षा झाली आहे. तर अन्य दोन गुन्ह्यांसाठी प्रत्येकी 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दोन वर्षांपर्यंत लैंगिक शोषण
रफीने मार्च 2020 मध्ये मुलीचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी मुलगी 14 वर्षांची होती. हा प्रकार 2021 पर्यंत जारी राहिला. याविषयी कुणासमोर वाच्यता केल्यास जीव घेईन अशी धमकी त्याने पीडितेला दिली होती. मुलीच्या वर्तनात झालेला बदल पाहिल्यावर तिच्या आईवडिलांनी तिला एका समुपदेशन केंद्रात नेल होते, जेथे तिने लैंगिक शोषणाविषयी सांगितले होते.
त्यापूर्वीही अन्य मुलीचे लैंगिक शोषण
हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी पीडितेच्या आईवडिलांकडून नोंद तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदविला होता. रफीला यापूर्वी देखील कन्नूर जिल्ह्यातील एका मदरशात अन्य अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. त्याने दुसरा गुन्हा हा पॅरोलवर बाहेर असताना केला आहे.