माडखोल सापळे स्टॉप येथे दोन दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मर; महावितरणचे उपअभियंता शैलेश राक्षे यांचे आश्वासन;ग्रामस्थांना दिलासा
ओटवणे / प्रतिनिधी : माडखोल सापळे स्टॉप येथील ट्रान्सफॉर्मर गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने या भागाचा वीजपुरवठा सध्या डुंगेवाडी येथील ट्रान्सफॉर्मरवरून करण्यात येत आहे. परिणामी डुंगेवाडी परिसरातील ग्राहकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीज समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर माडखोल ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सोमवारी महावितरणचे उपअभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेऊन विविध वीज समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी सापळे स्टॉप येथे दोन दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येईल, असे आश्वासन राक्षे यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी जीवन केसरकर यांनी कारिवडे गावातून येणाऱ्या विद्युत वाहिनीला माडखोल गावातील विद्युत वाहिनीशी जोडण्याची मागणी केली. त्यावर राक्षे यांनी कुलकर्णी, लाईनमन यांना या कामासाठी सर्व्हे करण्याचे आदेश दिले.
माजी सरपंच राजन राऊळ यांनी माडखोल येथील महावितरणचे कार्यालय गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपअभियंता राक्षे यांनी माडखोल परिसराचे सहाय्यक अभियंता श्री. बागवान यांना मंगळवारपासून माडखोल वीज उपकार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.
वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांनी विविध वीज समस्यांबाबत ग्रामस्थांकडून देण्यात आलेल्या निवेदनांची पोहोच मिळत नसल्याची तक्रार केली. तसेच उपसरपंच दत्ताराम कोळमेकर यांनी धवडकी येथील दत्त मंदिर परिसरातील ११ के.व्ही. मेनलाईन सुरू करण्याची मागणी केली. त्यावर येत्या एक महिन्यात 11 के.व्ही. मेनलाईन सुरू करण्याचे आश्वासन राक्षे यांनी दिले.
यावेळी माजी सरपंच राजन राऊळ, संजय लाड, उपसरपंच दत्ताराम कोळमेकर, शिवसेना ओबीसी सेलचे तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर, विविध कार्यकारी सोसायटीचे प्रकाश नाईक, दशरथ राऊळ, जानू तेली, उत्तम सावंत, जीवन केसरकर, लखन आडेलकर, सुरेश नार्वेकर, श्रीकांत गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.