माडखोल -धवडकी शाळेचा परिसर आता CCTV च्या निगराणीत
ओटवणे प्रतिनिधी
माडखोल धवडकी शाळेचा परिसर आता CCTV च्या निगराणीत आला असुन माडखोल ग्रामपंचायतच्या माध्यमातून शालेय परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत . त्यामूळे शाळेच्या वेळेबाहेर शालेय परिसर सुरक्षित ठेवण्यात हातभार लागणार आहे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत आय एस ओ मानांकित माडखोल धवडकी शाळा नं . २ ने सावंतवाडी तालुक्यात प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्हयात तिसरा क्रमांक पटकाविला होता. माडखोल धवडकी शाळा नंबर २ चे विविधांगी उपक्रम आदर्शवत व प्रेरणादायी असुन लोकसहभागातून आयएसओ मानांकन प्राप्त झालेली ही शाळा या गावचे भूषण आहे. या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक व ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद असून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी या शाळेचा आदर्श घ्यावा असे या शाळेचे उपक्रम आहेत. सावंतवाडी तालुक्यातील पहिली अ एस ओ मानांकित या शाळेने विविध स्पर्धा, शैक्षणिक उपक्रमात केवळ जिल्हा, राज्य पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर सुध्दा दैदिप्यमान यश मिळवून दिले.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान या अभियानातही या शाळेनेही सक्रिय सहभाग घेतला तो पुनः एकदा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याच्या उद्देशानेच. शिक्षकांनी हाक दिल्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी, गावानेही साथ दिली. सर्व शालेय कमिट्या, पालक, ग्रामस्थ, हितचिंतक, शिक्षक व विद्यार्थी यांनी कंबर कसुन अथक परिश्रमातून शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्ह्यातही तृतीय क्रमांक पटकावला.यासाठी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापिका भावना गावडे, शिक्षक अरविंद सरनोबत, समीक्षा राऊळ, वैदेही सावंत, केशव जाधव, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ नियोजन करतात.