मडकईकर यांनी ‘त्या’ मंत्र्याचे नाव जाहीर करावे : मोन्सेरात
पणजी : भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच माजी मंत्री पांडुरंग मडकईकर हे अनुभवी व कसलेले राजकारणी आहेत. त्यांनी केलेले खुलासे हे विचार करायला लावणारे आहेत. त्यामुळे पांडुरंग मडकईकर यांनी ज्या मंत्र्याला पैसे दिले आहेत, त्यांचे नाव स्पष्टपणे जाहीर करायला हवे, असे मत महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी व्यक्त केले आहे. पांडुरंग मडकईकर यांना काम करवून घेण्यासाठी 15 ते 20 लाख ऊपये मोजावे लागल्याचे सांगितल्याने राजकीय वातावरण तापले आहे. पैसे घेणारा मंत्री कोण याबाबत लोकांमध्ये चर्चा होत आहे. परंतु मडकईकर यांनी सरकारातील कोणत्याच मंत्र्याचे नाव न घेतल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. वास्तविक पांडुरंग मडकईकर आणि माझे संबंध हे फार पूर्वीपासून असून, आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. या मित्रत्वाच्या नात्यानेच मी त्यांना मंत्र्याचे नाव जाहीर करण्याबाबत सूचविल्याचे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.