मध्य प्रदेशचा कर्नाटकवर मोठा विजय
वृत्तसंस्था/ अलूर
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या इलाईट ब गटातील सामन्यात मध्य प्रदेशने यजमान कर्नाटकाचा 217 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात गोलंदाजीत 7 बळी आणि फलंदाजीत 32 धावा करणाऱ्या मध्य प्रदेशच्या सारांश जैनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्या डावात 323 धावा जमविल्या. त्यानंतर कर्नाटकाचा पहिला डाव केवळ 191 धावांत आटोपल्याने मध्य प्रदेशने 132 धावांची आघाडी मिळविली. मध्य प्रदेशने आपला दुसरा डाव 8 बाद 229 धावांवर घोषित करुन कर्नाटकाला निर्णायक विजयासाठी 362 धावांचे आव्हान दिले. पण मध्य प्रदेशच्या अचूक गोलंदाजीसमोर कर्नाटकाचा दुसरा डाव 67.5 षटकात 144 धावांत आटोपला.
मध्य प्रदेशने 6 बाद 204 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांनी आपला दुसरा डाव 75.1 षटकात 8 बाद 229 धावांवर घोषित केला. मध्य प्रदेश संघातील सलामीच्या हिमांशू मंत्रीने 4 चौकारांसह 96 तर शुभम शर्माने 32 धावा जमविल्या. कर्नाटकाच्या विद्याधर पाटीलने 4 तर शिखर शेट्टी व श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर कर्नाटकाचा डाव 67.5 षटकात 144 धावांत आटोपला. सलामीच्या अनिशने 7 चौकारांसह 57 धावा जमविल्या. अनिशने कर्नाटकाच्या पहिल्या डावात 92 धावांची खेळी केली. निकीन जोशने 2 चौकारांसह 26 तर विद्याधर पाटीलने 5 चौकारांसह नाबाद 26 धावा जमविल्या. मध्य प्रदेशतर्फे सारांश जैन आणि सागर सोळंकी यांनी प्रत्येकी 3 तर आर्यन पांडेन 2, कार्तिकेय व कुलदीप सेन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक - मध्य प्रदेश प. डाव 323, कर्नाटक प. डाव 191, मध्य प्रदेश दु. डाव 75.1 षटकात 8 बाद 229 डाव घोषित (मंत्री 96, शुभम शर्मा 32, विद्याधर पाटील 4-54, शिखर शेट्टी व श्रेयस गोपाल प्रत्येकी 2 बळी), कर्नाटक दु. डाव 67.5 षटकात सर्वबाद 144 (अनिश 57, जोश 26, विद्याधर पाटील नाबाद 26, सारांश जैन व सोळंकी प्रत्येकी 3 बळी, पांडे 2-9, कार्तिकेय व कुलदीप सेन प्रत्येकी 1 बळी).