For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यप्रदेशचे मंत्री नागर सिंह चौहान नाराज

06:52 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेशचे मंत्री नागर सिंह चौहान नाराज
Advertisement

मंत्रिपद सोडणार : पत्नी देणार संसद सदस्यत्वाचा राजीनामा

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले नागर सिंह चौहान हे वन विभागाचा प्रभार काढून घेण्यात आल्याने नाराज झाले आहेत. त्यांनी बंडखोरीचे संकेत देत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास झाबुआ-रतलाम मतदारसंघाच्या खासदार अनिता नागर सिंह चौहान देखील राजीनामा देतील असा इशारा त्यांनी दिली आहे.

Advertisement

मोहन यादव सरकारमध्ये मंत्री असलेले नागर सिंह यांच्याकडे तीन विभाग होते.  मुख्यमंत्र्यांनी रविवारी रामनिवास रावत यांच्याकडे वन आणि पर्यावरण विभागाची जबाबदारी सोपविली आहे. यामुळे नागर सिंह चौहान नाराज झाले आहेत. त्यांच्याकडे आता केवळ अनुसूचित जाती कल्याण मंत्रालयाची जबाबदारी शिल्लक आहे. कॅबिनेटमध्ये स्वत:चे महत्त्व कमी झाल्याचे त्यांचे मानणे आहे. नागर सिंह चौहान यांच्या पत्नी अनिता नागर सिंह या लोकसभा खासदार आहेत. सोमवारपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून यात सर्व खासदारांनी भाग घेणे अपेक्षित होते. अनिता नागर सिंह या दिल्लीसाठी रवाना होणार होत्या, परंतु रविवारच्या घटनाक्रमानंतर त्यांनी दिल्ली दौरा स्थगित केला आहे.

एखादा विभाग काढून घेण्यापूर्वी कल्पना देणे आवश्यक होते. माझ्याकडील विभाग काढून घेत काँग्रेसमधून दाखल झालेल्या नेत्याला देणे गैर आहे. याप्रकरणी मी पक्षाच्या व्यासपीठावर भूमिका मांडणार असल्याचे नागर सिंह चौहान यांनी म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा यांच्यासमोर त्यांनी स्वत:चे म्हणणे मांडल्याचे समजते. या प्रकरणी तोडगा न निघाल्यास पत्नी अनिता नागर सिंह लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे नागर सिंह चौहान यांनी प्रदेशाध्यक्षांना सांगितले आहे.

अलीराजपूर हा  काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. तेथून मी सातत्याने काँग्रेससोबत लढत आहे. सातत्याने निवडणूक जिंकल्याने मध्यप्रदेश सरकारमध्ये अलीराजपूर जिल्ह्याला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले. परंतु कुठलीही कल्पना न देता माझ्याकडील दोन विभाग काढून घेत काँग्रेसमधून दाखल झालेल्या रामनिवास रावत यांना देण्यात आले. याचमुळे मी दुखावलो गेला आहे. पदावर आता राहू नये असे माझे मत तयार झाले असल्याचे नागर सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.