अनिर्णीत सामन्यात मध्यप्रदेशला तीन गुण
वृत्तसंस्था / इंदौर
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी यजमान मध्यप्रदेश आणि चंदीगड यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात मध्यप्रदेशने पहिल्या डावात चंदीगडवर आघाडी घेतल्याने त्यांना या सामन्यात 3 गुण मिळाले.
मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी यजमान मध्यप्रदेशने दुसऱ्या डावात 27 षटकात 3 बाद 73 धावा जमविल्या. हर्ष गवळी 33 धावांवर बाद झाला. भाटियाने नाबाद 15 धावा केल्या. या सामन्यात मध्यप्रदेशने चंदीगडवर पहिल्या डावात 38 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविल्याने त्यांना तीन गुण मिळाले.
या सामन्यामध्ये मध्यप्रदेशने पहिला डाव 8 बाद 348 डावांवर घोषित केला. त्यानंतर चंदीगडने पहिल्या डावात 310 धावा जमविल्या. त्यानंतर मध्यप्रदेशने दुसऱ्या डावात 3 बाद 73 धावा जमविल्या. चंदीगडच्या बिर्लाने 21 धावांत 2 बळी मिळविले.
चंदीगडमध्ये या स्पर्धेतील खेळविण्यात आलेला यजमान पंजाब आणि गोवा यांच्यातील सामनाही अनिर्णीत राहिला. या सामन्यात गोवा संघाने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर तीन गुण मिळविले. या सामन्यात पंजाबने पहिल्या डावात 325 धावा जमविल्यानंतर गोवा संघाने आपला पहिला डाव 6 बाद 494 धावांवर घोषित केला. मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी पंजाबने दुसऱ्या डावात 4 बाद 179 धावा जमविल्या. हरनुर सिंगने 49, वधेराने नाबाद 55, रमनदीप सिंगने नाबाद 36 धावा केल्या. गोवा संघातर्फे दर्शन मिसाळने 57 धावांत 2 गडी बाद केले.
नाशिकमध्ये या स्पर्धेतील सामन्यात खेळाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातील लढत अनिर्णीत राहिली. सौराष्ट्राने आपला पहिला डाव 5 बाद 394 धावांवर घोषित केला. हर्विक देसाईने 132, गोहीलने 115 तर वासवदाने नाबाद 73 धावा झळकविल्या. या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने बराच खेळ वाया गेला. महाराष्ट्राने पहिल्या डावात 10 षटकात 1 बाद 55 धावा जमविल्या. अर्शिन कुलकर्णी 35 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक: -इंदौर-मध्यप्रदेश प. डाव 8 बाद 348 डाव घोषित, चंदीगड प. डाव 310, मध्यप्रदेश दु. डाव 27 षटकात 3 बाद 73
चंदीगड-पंजाब प. डाव 325, गोवा प. डाव 6 बाद 494 डाव घोषित, पंजाब दु. डाव 4 बाद 179
नाशिक-सौराष्ट्र प. डाव 5 बाद 394 डाव घोषित (हार्विक देसाई 132, गोहील 115, वासवदा नाबाद 73, मुकेश चौधरी 2-96), महाराष्ट्र प. डाव 1 बाद 55 (अर्शिन कुलकर्णी नाबाद 35, कणबी 1-6)