For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यप्रदेश उपांत्यपूर्व फेरीत दाखल, शिवांगचे 5 बळी, कर्नाटक पराभूत

10:35 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेश उपांत्यपूर्व फेरीत दाखल  शिवांगचे 5 बळी  कर्नाटक पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/अहमदाबाद

Advertisement

नवोदित फिरकी गोलंदाज शिवांग कुमारच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात मध्यप्रदेशने बलाढ्या कर्नाटकाचा 7 गड्यांनी पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. या गटातून कर्नाटकाने यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेत अ गटातून कर्नाटकाचा संघ 24 गुणांसह पहिल्या स्थानावर असून मध्यप्रदेशने 7 सामन्यांतून 20 गुण घेत दुसरे स्थान मिळविले. आता या गटातून कर्नाटक आणि मध्यप्रदेश हे दोन संघ बाद फेरीसाठी बाद ठरले आहेत.

गुरूवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकाचा डाव 47.4 षटकांत 207 धावांत आटोपला. त्यानंतर मध्यप्रदेशने 23.2 षटकांत 3 बाद 208 धावा जमवित त्यांनी कर्नाटकाचा 7 गड्यांनी पराभव केला. कर्नाटकाच्या डावात मयांक अगरवालने 49, देवदत्त पडीक्कलने 35 धावा जमविल्या. मध्यप्रदेशच्या शिवांग कुमारने 45 धावांत 5 गडी बाद केले. 26 वर्षीय शिवांगचा हा लिस्ट ए विभागातील तिसरा सामना आहे. मध्यप्रदेशच्या या सामन्यातील विजयामुळे कर्नाटकाची गेल्या सहा महिन्यातील विजय घोडदौड खंडीत झाली. मध्यप्रदेशच्या डावामध्ये यश दुबेने 40 तर वेंकटेश अय्यरने नाबाद 65 धावा झळकविल्या. 2026 च्या आयपीएल स्पर्धेसाठी सनरायजर्स हैदराबादने शिवांग कुमारला 30 लाख बोलीच्या जोरावर खरेदी केले आहे. मध्यप्रदेशच्या डावांत हिमांशु मंत्रीने 34 धावा जमविताना यश दुबेसमवेत 78 धावांची भागिदारी केली.

Advertisement

संक्षिप्त धावफलक : कर्नाटक 47.4 षटकांत सर्वबाद 207 (अगरवाल 49, पडीक्कल 35, शिवांग कुमार 5-45), मध्यप्रदेश 23.2 षटकांत 3 बाद 208 (यश दुबे 40, हिमांशु मंत्री 34, वेंकटेश अय्यर नाबाद 65).

तामिळनाडू विजयी 

या स्पर्धेतील गुरूवारी झालेल्या अन्य एका सामन्यात तामिळनाडूने केरळचा 77 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे या गटातून केरळचे बाद फेरीत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. या सामन्यात तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 294 धावा जमविल्या. त्यानंतर केरळचा डाव 40.2 षटकांत 217 धावांत आटोपला. तामिळनाडूच्या डावात नारायण जगदिशनने दमदार शतक झळकविताना 139 धावा झोडपल्या. केरळच्या टॉमने 46 धावांत 6 गडी बाद केले. त्यानंतर केरळच्या डावामध्ये रोहन कुनुमलने 73 धावा जमवित एकाकी लढत दिली. तामिळनाडूतर्फे सचिन राठी आणि मोहम्मद अली यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक: तामिळनाडू 50 षटकांत 8 बाद 294 (जगदिशन 139, टॉम 6-46), केरळ 40.2 षटकांत सर्वबद 217 (कुनुमल 73, सचिन राठी व मोहम्मद अली प्रत्येकी 4 बळी).

झारखंड पराभूत 

या स्पर्धेतील गुरूवारी झालेल्या अन्य एका सामन्यात त्रिपुराने झारखंडचा 197 धावांनी दणदणीत पराभव केला.या पराभवामुळे झारखंडचे या स्पर्धेची उपांत्यपूर्वफेरी गाठण्याचे स्वप्न अधुरे राहिले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना त्रिपुराचा डाव 50 षटकांत 320 धावांत आटोपला. एस.पॉलने 150 तर रजत डे ने 102 धावा झळकविल्या. झारखंडतर्फे सुशांत मिश्राने 52 धावांत 6 गडी बाद केले. त्यानंतर झारखंडचा डाव 31.1 षटकांत 123 धावांत समाप्त झाला. त्रिपुरातर्फे अभिजित सरकारने 40 धावांत 4 तर अजय सरकार आणि स्वप्नील सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात राजस्थानने पुडुचेरीचा 132 धावांनी पराभव केला. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 269 धावा जमविल्या. करण लांबाने शानदार शतक (108) झळकविले. पुडुचेरीच्या उदेशीने 3 गडी बाद केले. त्यानंतर पुडुचेरीचा डाव 26.5 षटकांत 137 धावांत आटोपला. नितीन प्रणवने 56 धावांचे योगदान दिले. राजस्थानच्या दानीशने 35 धावांत 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक: त्रिपुरा 50 षटकांत सर्वबाद 320, झारखंड 31.1 षटकांत सर्वबाद 123, राजस्थान 50 षटकांत 8 बाद 269, पुडुचेरी 26.5 षटकांत सर्वबाद 137.

Advertisement
Tags :

.