Madhurima Raje Chhatrapati: श्रावणमासी येई सखे, सय माहेराची, श्रावण गप्पा विथ मधुरिमा राजे..
गप्पांच्या निमित्ताने मधुरिमा राजे माहेरच्या जुन्या आठवणींमध्ये रमून गेल्या...
By : दिव्या कांबळे, गौतमी शिकलगार
कोल्हापूर : श्रावण महिना म्हणजे सृष्टीचा उत्सव... मनमोहक निसर्ग, सणांची रेलचेल, आणि मनमोकळ्या माहेर गप्पांची साथ! अशाच श्रावणगप्पांच्या निमित्ताने तरूण भारत संवादने कोल्हापुरातील एक खास व्यक्तिमत्त्व असलेल्या मधुरिमा राजे छत्रपती यांच्याशी संवाद साधला. कोल्हापुरातील प्रतिष्ठित खानविलकर कुटुंबातील त्यांच्या बालपणापासून ते छत्रपती शाहूंनी घडवलेल्या परंपरेशी नातं जुळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे एक जिवंत कहाणीच! या गप्पांच्या निमित्ताने मधुरिमा राजे माहेरच्या जुन्या आठवणींमध्ये रमून गेल्या.
तुमच्या बालपणाबद्दल काय सांगाल?
उत्तर : सर्वप्रथम तरुण भारत टीमचे आभार मानते. तुम्ही हा आगळावेगळा उपक्रम राबवताय, त्याबद्दल शुभेच्छा. माझ्या वडिलांचं नाव दिग्विजय खानविलकर आणि आईचं नाव राजलक्ष्मी खानविलकर. धाकटे भाऊ विश्वविजय खानविलकर. मी नऊ वर्षांची असेपर्यंत आमचं एकत्र कुटुंब होतं. ताराबाई पार्क येथे आमचा बंगला होता. घराला लागूनच एक ग्राऊंड होतं. आम्ही सगळे आजूबाजूचे मित्र-मैत्रिणी एकत्र जमून खेळायचो. संध्याकाळी शाळा सुटली की क्रिकेट, बॅडमिंटन खेळायचो. घरामध्ये टेनिस टेबल होतं. मी टेबल टेनिस खेळायचे. आई, वडील राजकारणात अॅक्टिव्ह होते. त्यामुळे आजी प्रमिलाराजे खानविलकर यांच्याकडेच मी आणि माझा भाऊ लहानाचे मोठे झालो.
तुमचं माहेर आणि माहेरच्या श्रावणातील आठवणी याबद्दल काय सांगाल?
उत्तर : माझ्या आजींना सण, परंपरा याचे खूप अप्रूप होतं. त्यामुळे सण आला की आधी त्यांची महिनाभर तयारी चालू व्हायची. त्यांच्या हाताखाली काम करून आम्हाला माहीत व्हायचं, श्रावण येणार आहे. मग आता सगळ्या पूजा चालू होणार. श्रावणामध्ये निसर्ग छान फुलून येतो. हिरव्या पालेभाज्या खायला मिळतात. श्रावणामध्ये सगळं असं छान असतं. हिरवागार निसर्ग त्याचबरोबर आपली परंपरा जपत विविध सण साजरे करायचो. नागपंचमीला सगळीकडेच झोपाळे बांधलेले असायचे. आम्हीही झोपाळ्यावरती बसायचो. आजूबाजूच्या महिला पारंपरिक नऊवारीत, तर काही सहावारीत साडीत नटून यायच्या. तेंव्हा परकर पोलक्याचं प्रस्थ जास्त होतं. ते सगळं मी वापरायचे. खूप छान वाटायचं. सगळे गाणे म्हणायचे, श्रावणाचे सगळे जण खेळ खेळायचे. अशा पद्धतीने या सर्व परंपरा आम्ही लहानपणापासून शिकत गेलो.
शालेय जीवनाविषयी काय सांगाल?
उत्तर : मी शाळेला नवीन राजवाडा परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयात सहावीमध्ये आले. खरं तर माझ्या आईची इच्छा होती, की आम्ही हॉस्टेलला जावं आणि तिथं शिकावं. पण माझ्या आजींची आणि वडिलांची अजिबात इच्छा नव्हती. आत्ताचे श्री छत्रपती शाहू महाराज यांनी छत्रपती शाहू विद्यालय सुरू केले. त्यावेळेस माझ्या आजींना खूप आनंद झाला आणि मला आणि माझ्या भावाला या शाळेमध्ये घातलं. या शाळेत आमची पहिली बॅच होती ज्यांनी शाळेत गणेशोत्सव सुरू केला. अजूनही हा गणपती विद्यार्थी पालखीतूनच घेऊन येतात. नवरात्रीमध्ये दांडिया, मंगळागौरीचे खेळसुद्धा आम्ही शाळेमध्ये खेळलेलो आहे.
तुमचे लहानपणीचे खेळ आणि खेळातून फिटनेस याविषयी काय सांगाल?
उत्तर : खेळ तर आमच्या आवडीचा विषय होता. 1985 मध्ये या शाळेमध्ये आले, तेव्हा आमच्या येथे स्पोर्टला महत्त्व होते. त्यावेळी आम्ही सगळ्यांनी फुटबॉल खेळ निवडला आणि आमची फुटबॉलची टीमदेखील झाली. आम्हाला कोचेस चांगले मिळाले. अजूनही आमचा फिटनेस जो आहे, हा फक्त आणि फक्त या शाळेमुळे. आम्हाला या शाळेने फिटनेसचं महत्त्व हे शिकवलं.
खानविलकरांची कन्या ते छत्रपती घराण्याची सून हा प्रवास कसा होता?
उत्तर : दिग्विजय खानविलकरांची कन्या म्हणून अतिशय बिनधास्त जगली. डॅडींमुळे आयुष्याचा बराच काळ सर्वसामान्यांमध्ये घालवता आला. वडिलांचा मतदारसंघ हा करवीर मतदार संघ होता. करवीर मतदार संघामध्ये जे त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांचे मतदार होते हे सगळे जास्तीत जास्त शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातले होते. त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी सोडवल्या आणि लोकांसाठी काम केलं. शाहू महाराज हे डॅडींचे आदर्श होते. कोल्हापूरमध्ये मूलभूत सुविधा आणि त्यानंतर औद्योगिक व्यवसाय हे डॅडींनी आणले. त्या काळामध्ये अनेक इंडस्ट्रीज डॅडींनी कोल्हापूरमध्ये आणल्या. त्या इंडस्ट्रीज आणत असताना आम्ही त्या लोकांना भेटायला जायचो, इंडस्ट्रियल फेअर्सला जायचो. वडिलांच्या घरामध्ये राजकीय, औद्योगिक क्षेत्र, समाजकारण असेल सर्वकाही डॅडींमुळे माहेरीच समजलं होतं आणि अनुभवलं होतं.
तुमचा जनसंपर्क कसा विकसित होत गेला?
उत्तर : माझ्या आई स्वभावाने कडक जरी असल्या तरी त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला एक वळण आणि शिस्त मिळाली. माहेरी असताना वडिलांच्या विधानसभा मतदारसंघात 40 खेडेगाव आणि शहरातील ई वार्ड म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भाग होता. डॅडी अधिवेशनात गेले असतील, तर आम्ही लोकांमध्ये जायचो. मयतीला जायचो, बाळाच्या बारशाला जायचो, लग्नाला जायचो. लोक अगदी आवर्जून मायेनं तोंडावर हात फिरवून प्रेम द्यायचे. ही लोकं आम्हा दोघा बहिणभावामध्ये डॅडींना बघायचे. अशी ही जी सामाजिक बांधिलकी आहे, ती मला आमच्या माहेरकडूनच अनुभवायला मिळाली. सर्वसामान्यांच्या बरोबर काम केल्यामुळे मला समाजाच्या अडचणींची जाण झाली. त्यामुळे इकडं छत्रपती राजघराण्यामध्ये आल्यानंतर मला फारसा त्रास नाही झाला.
माहेर आणि सासरकडील प्रेम, आपुलकी आणि जबाबदारी कशी होती?
उत्तर : या सगळ्याच्या पलीकडं माझ्या जडणघडणीमध्ये शाहू महाराजांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. कारण जेव्हा इथं छत्रपती शाहू विद्यालयात शिकत होते. तेव्हा कल्चरल, स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीजमध्ये कायम महाराज मुलांना प्रोत्साहन द्यायला आमच्याबरोबर असायचे. आम्ही मॅचेस खेळल्यानंतर महाराज आम्हाला आईक्रीम खायला द्यायचे. सगळ्या मुलांबरोबर वेळ घालवायचे. शाळेच्या माध्यमातून आम्ही कॅम्पसमध्ये जायचो. त्यामध्ये आम्ही सगळेच महाराजांबरोबर काम करायचो. त्यामध्ये मालोजीराजे आहेत म्हणून त्यांना वेगळी काही ट्रीटमेंट ते देत नव्हते. सर्वसामान्य म्हणूनच महाराज आमच्या सोबत राहायचे आणि मालोजीराजेंचा सुद्धा रुबाब कधीच नव्हता. ते सुद्धा अगदी सर्वसामान्यांच्यातच मिक्स होऊन वागायचे. आम्हाला दोघांना सुद्धा एकमेकांचा स्वभाव माहीत होता. तेव्हापासूनच आमच्यात खूप छान आणि इमोशनल बॉण्डिंग तयार झालं होतं. राणीसाहेब महाराज एकदम प्रेमळ स्वभावाच्या आहेत. त्या सगळ्यांना खाऊ पिऊ घालणाऱ्या आणि लाड करणाऱ्या काळजी घेणाऱ्या आहेत. त्यामुळे इथे आल्यावरसुद्धा आई-वडीलच जवळ असल्यासारखंच वाटत होतं. माहेरी जसे आई-वडील, तसेच सासरी पण आई-वडील होते. त्यामुळे जबाबदाऱ्या जरी असल्या, तरी त्या पेलण्याची ताकद ते दोघे देत होते. अजूनही तसाच पाठिंबा ते देत आहेत. म्हणूनच मला माहेर आणि सासर खूप काही वेगळं नाही वाटलं. आणि अजूनही वाटत नाही!
बालपणातील खोड्यांचा किस्सा आठवतोय का?
उत्तर : माझ्या वडिलांचा मला नेहमी सपोर्ट होता. त्यांना मला आणि माझ्या भावाला कधीच तू मुलगी आहेस, तू मुलगा आहेस असं ट्रीट केलं नाही. विवेकानंद कॉलेजला अकरावीत असताना दर फ्रायडेला प्रॅक्टिकल असायचं. ते झालं की आमचा ग्रुप होता 30 जणांचा. आम्ही सगळेजण पिक्चरला जायचो. ही गोष्ट शिक्षकांनी आईला सांगितली. आई रागावली, पण माझे वडील म्हणाले राहू दे, आता काय मुलं आपलीच आहे. तर चालायचंच. अशा प्रकारे कायम त्यांचा सपोर्ट होता. मी घरी काही दडवून केलं नाही. माझ्या वडिलांना सगळं माहीत असायचं.
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=Jco5lRZpoVs[/embedyt]