मधू कोडा यांची याचिका फेटाळली
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि कोळसा खाण घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी मधू कोडा यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या घोटाळा प्रकरणात कोडा यांना दोषी धरण्यात आलेले आहे. आपल्या दोषित्वाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सादर केली होती. या कोळसा घोटाळा प्रकरणात मधू कोडा यांच्यासह झारखंडचे तत्कालीन कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, झारखंडचे माजी मुख्य सचिव ए. के. बसू आणि कोडा यांचे एक निकटवर्तीय विजय जोशी यांना प्रत्येकी 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आपल्याला झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून भाग घेता यावा, यासाठी आपल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कोडा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेच्या माध्यमातून केली होती.