For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेत्यांच्या अहंकारामुळेच माढ्याची जागा भाजपकडून निसटली

03:15 PM Jun 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
नेत्यांच्या अहंकारामुळेच माढ्याची जागा भाजपकडून निसटली
Advertisement

शिरीषकुमार महामुनी कुर्डुवाडी

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी विद्यमान खा. रणजितसिंह निंबाळकरांचा पराभव करत विजयाची तुतारी वाजवून मागील पंचवार्षिकमधील रणजितसिंह निंबाळकरांच्या विजयाचे खरे शिल्पकार आपणच होतो हे देखील आजच्या धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या विजयाने अधोरेखीत केले आहे. खरंतर भाजपच्या काही नेत्यांच्या अहंकारामुळेच भाजपला ही जागा गमवावी लागत असल्याचे जाणकार बोलत आहेत.

Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने आसुरी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आपलेसे करून त्यांना सत्तेत सहभागी करत शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पाडली. बुद्धिचातुर्याने भाजपसोबत गेलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या गटाने बहुमताच्या जोरावर पक्षावर व चिन्हावर दावा ठोकत पक्ष आणि चिन्ह मिळवले होते. बहुतांश विद्यमान आमदार हे भाजपमध्ये सत्तेत सामील झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना नवीन पक्ष आणि चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागले.

माढा लोकसभेसाठी भाजपकडून विद्यमान खा. रणजितसिंह निंबाळकर व भाजप संघटक असणारे धैर्यशील मोहिते-पाटील हे दोघे इच्छुक होते. वास्तविक पाहता निंबाळकर हे मागील पंचवार्षिक काळात मतदार संघात व कार्यकर्त्यांत आपला ठसा उमटविण्यात अयशस्वी ठरले. मात्र वरिष्ठांना खूष करण्यात ते यशस्वी ठरल्यामुळे भाजपने मोहिते-पाटील व कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करत पुन्हा निंबाळकरांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज कार्यकर्ते व दुसऱ्या ओळीतील नेते मंडळींनी मोहिते-पाटील यांना निवडणूक लढविण्याबाबत आग्रह धरला. त्यासाठी अनेकवेळा वरिष्ठांबरोबर चर्चाही झाली. पण केवळ दुर्लक्ष केल्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांनी चंग बांधला आणि मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तुतारी हातात घेऊन लढण्याचा आग्रह धरला. त्याचवेळी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे अकलूज येथे आले. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी पाहिल्या. मात्र भाजपच्या वरिष्ठांनी कार्यकर्ते आणि जनभावनेकडे दुर्लक्ष करत केवळ माढा लोकसभेतील महायुतीतील सहा विधानसभा आमदारांशी चर्चा करून निंबाळकरांचेच तिकीट फायनल केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे एरवी कधी बाहेर न पडणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे पुतण्यासाठी आपल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघात भेटी देऊन आपला गट मजबूत करत होते. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अखेर भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आणि माढा लोकसभेसाठी भाजपच्या रणजितसिंहांपुढे शड्डू ठोकला.

Advertisement

माढा, करमाळा, फलटण याठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार तर सांगोला येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार व माळशिरस व माण येथे भाजपचे आमदार या सहाही ठिकाणी भाजपचे आमदार असल्यामुळे भाजपला माढा लोकसभा निवडणूक ही सोपी जाईल असे वाटत होते. मात्र जनतेच्या मनात काही वेगळेच होते. निवडणुकीनंतर पक्ष फोडून सत्तेत सामील झालेल्या नेत्यांबरोबर जनता ही गेलीच नाही. फोडाफोडीच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत जनतेत सहानुभूती निर्माण झाली आणि याचा फायदा हा धैर्यशील मोहिते-पाटील यांना झाला. या सहाही मतदारसंघातील लोकप्रतिनिधी निंबाळकरांना निवडून आणण्यात अयशस्वी ठरले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धैर्यशील या लाटेवर स्वार होत विजयी झाले.

मोहिते-पाटील यांच्या प्रवेशामुळे दोन्ही जागा जिंकल्या.
मोहिते-पाटील यांचा महाविकास आघाडीत झालेल्या प्रवेशामुळे माढ्यात तर विजय मिळालाच. पण सोलापुरातही कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय सुकर झाला.

Advertisement
Tags :

.