मडगावचा प्रसिद्ध ‘दिंडी’ महोत्सव आज
गायनाच्या दोन बैठका न्यू मार्केट युको बँकेजवळ : राजयोग धुरी ठरणार खास आकर्षण,दिंडी, आकाश पंदील, रांगोळी स्पर्धा
मडगाव : श्री हरिमंदिरचा प्रतिवार्षिक मुख्य दिंडी उत्सव आज सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. यंदा दिंडी उत्सवाला गोवा सरकारची राज्य मान्यता मिळाल्याने उत्सवाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. आज सोमवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी होतील. सायंकाळी 6.30 वा. श्रींची उत्सवमूर्ती, वीणा व पुरातन पोत्यांसह पालखी रथात स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर गायनाची पहिली बैठक सायंकाळी 7.30 वा. श्री हरिमंदिराच्या प्रांगणात होणार असून त्यात सुप्रसिद्ध युवा गायक राजयोग धुरी (पुणे) व सौ. स्वरांगी मराठे (मुंबई) आपली कला सादर करणार आहेत.
तद्नंतर पालखीरथ मठग्राम नगरीत परिक्रमेला निघणार आहे. यंदा पावसाचे सावट असल्यामुळे गायनाच्या दुसऱ्या बैठकीबरोबरच तिसरी बैठकसुद्धा मडगावच्या न्यू मार्केट परिसरातील युको बँकेजवळ होणार आहे. या ठिकाणी खास मंडप घातला आहे. दिंडी उत्सवातील तिसरी बैठक मडगाव नगरपालिका चौकात होत असे. मात्र, यंदा पावसामुळे ती रद्द करून न्यू मार्केट परिसरात युको बँकेजवळील व्यासपीठावर होणार आहे. याची सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
श्री दामबाबाले घोडेतर्फे दिंडी स्पर्धा
श्री दामबाबाले घोडे सांस्कृतिक संस्थेतर्फे यंदाही दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या दिंडी स्पर्धेला आज सोमवारी संध्याकाळी 5 वा. श्री हरिमंदिर देवस्थानपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेची सांगता स्टेट बँकजवळ उभारण्यात येणाऱ्या श्री दामबाब चौकात ‘रिंगण’ सादरीकरणाने होणार आहे. दिंडी स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना रोख रुपये 51,000, रु. 31,000 व रु. 25,000 तसेच दहा हजार रुपयांची उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. दामबाबाले घोडे सांस्कृतिक संस्थेच्यावतीने आकाश कंदील व फ्रुट व व्हेजीटेबल कार्विंग स्पर्धेचे आयोजन केले असून आकाश कंदील स्पर्धा नाविन्यपूर्ण व पारंपरिक अशा दोन गटात घेतली जाणार आहे. नाविन्यपूर्ण गटातील विजेत्यांना रोख रु. 6001, रु. 5001, रु. 4001, रु. 3001 व रु. 2001 अशी बक्षिसे दिली जातील. तसेच पारंपरिक गटातील विजेत्यांना रु. 4001, रु. 3001, रु. 2501, रु. 1501 व रु. 1001 अशी बक्षिसे दिली जातील.
सॉलीड पार्टीतर्फे रांगोळी स्पर्धा
सॉलीड पार्टी ट्रस्टतर्फे घेतली जाणारी रांगोळी स्पर्धा दिंडी महोत्सवाचे खास आकर्षण बनून राहिली आहे. ही स्पर्धा मडगाव पालिकेच्या आगाखान पार्कमध्ये घेतली जाणार असून स्पर्धकांनी सकाळी 8.30 वा. स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. ही स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ट गट अशा दोन गटांत घेतली जाणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील.
युवा संजीवनीतर्फे ‘स्वर दिंडी’
कोंब-मडगाव येथील युवा संजीवनीतर्फे दिंडी उत्सवानिमित्त ‘स्वर दिंडी’ या कार्यक्रमाचे आयोजन महिला व नूतन हायस्कूलजवळ करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अभिषेक काळे, शमिका भिडे, तेजस वेर्णेकर व मैत्रेयी नाईक हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
राजयोग धुरी : वय 17 वर्षे. अगदी लहानपणापासून गाण्याची प्रचंड आवड, 2 वर्षे पंडित अजित कडकडे यांचेकडे शास्त्राrय संगीताचे मार्गदर्शन घेतले. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या रियलिटी शो मध्ये तो विजेता ठरला. सध्या सोशल मिडीयावर शास्त्राrय संगीत, नाट्या संगीताचे त्याचे अनेक रिल्स लोकप्रिय ठरले आहेत. गोव्यात हल्ली सगळीकडे त्याचे कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात चालू आहेत. मडगाव रवींद्र भवन तसेच साखळी रवींद्र भवनातील कार्यक्रमांना श्रोत्यांकडून उदंड असा प्रतिसाद मिळाला होता.
सौ. स्वरांगी मराठे : या सुप्रसिद्ध भारतीय शास्त्राrय संगीताचे मानकरी तसेच मराठी नाटकाचे मानकरी स्वर्गवासी संगीत भूषण पंडित राम मराठे यांची नात आहे स्वरांगीने आपल्या वयाच्या आठव्या वर्षापासून आपले वडील मुकुंद मराठे व प्रदीप नाटेकर (जे स्वर्गवासी राम मराठेंचे शिष्य होते) यांच्याकडे शास्त्राrय गायनाचे धडे गिरवण्यास सुऊवात केली. गेल्या बारा वर्षांपासून त्या डॉक्टर विदुषी आश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे शास्त्राrय संगीताचे शिक्षण घेत आहेत. गायनाबरोबरच त्यांनी प्रभाकर पणशीकर निर्मित ‘अवघा रंग एकची झाला’ या नाटकात ‘जेन’ ची महत्त्वाची भूमिका निभावून महाराष्ट्र सरकारचा ‘बेस्ट एक्ट्रेस 2008’ पुरस्कार पटकावला होता. त्यांनी नादब्रम्ह आणि इतर ग्रुपबरोबर सोलो गायनाचे कार्यक्रम केलेले आहेत. त्यांनी चतुरंग फेस्टिव्हल तसेच इतर महोत्सवात आपली कला सादर केली आहे.