For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगाव-मंगळूर वंदे भारतचा बेंगळूरपर्यंत विस्तार; हासन, उडुपी, कारवार मार्गे धावणार

10:56 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मडगाव मंगळूर वंदे भारतचा बेंगळूरपर्यंत विस्तार  हासन  उडुपी  कारवार मार्गे धावणार
Advertisement

बेंगळूर : गोवा, कर्नाटक किनारपट्टी आणि बेंगळूर यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मडगाव-मंगळूर वंदे भारत एक्स्प्रेसचा बेंगळूरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या प्रस्तावाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिसाद देत विद्यमान सेवेचा विस्तार करण्याची माहिती दिली.

Advertisement

विस्तारित सेवा यशवंतपूर-बेंगळूर–हासन–मंगळूर–उडुपी–कारवार–मडगाव या मार्गावर धावणार असून, ती 26655/26656 यशवंतपूर-मंगळूर-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस या नावाने सुधारित वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहे.

या विस्तारामुळे बेंगळूरला मंगळूर, उडुपी, कारवार आणि गोव्यातील मडगाव या महत्त्वाच्या ठिकाणांशी थेट वंदे भारत रेल्वेसेवेने जोडले जाणार आहे. त्यामुळे किनारपट्टी कर्नाटक आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे बदलण्याची गरज कमी होऊन अधिक सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Advertisement

कुमारस्वामी यांनी बेंगळूर, कर्नाटक किनारपट्टी आणि गोवा या मार्गावर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पर्यटन, तीर्थयात्रा, शिक्षण आणि व्यावसायिक प्रवासासाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

रेल्वेमंत्र्यांच्या 28 सप्टेंबर 2026च्या पत्रात या विस्ताराची माहिती देण्यात आली आहे. मात्र, विस्तारित सेवेची प्रत्यक्ष सुरुवात कधी होणार आणि सुधारित वेळापत्रक काय असेल, याची अंतिम घोषणा अद्याप झालेली नाही.

या सेवेमुळे बेंगळूर–किनारपट्टी कर्नाटक–गोवा या महत्त्वाच्या मार्गावरील आंतरराज्य संपर्काला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच तीर्थयात्रेकरूंसाठी ही रेल्वेसेवा उपयुक्त ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.