मडगाव-एलटीटी होळी स्पेशल उद्यापासून धावणार
खेड :
शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली मडगाव-एलटीटी होळी स्पेशल १६ मार्चपासून धावणार आहे. या स्पेशलच्या ४ फेऱ्यांचा समावेश आहे.
०११०४/०११०३ क्रमांकाची मडगाव-एलटीटी साप्ताहिक स्पेशल १६ व २३ मार्च रोजी धावेल. रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मडगाव येथून सुटून पहाटे ६.२५ वाजता एलटीटीला पोहचेल. परतीच्या प्रवासात १७ व २४ मार्चला पावणारी स्पेशल एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याच दिवशी रात्री ९.४० वाजता महगाव येथे पोहचेल.
२० एलएचबी डब्यांची स्पेशल करमाळी, चिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आरवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण,पनवेल, ठाणे आदी स्थानकात थांबणार आहे. परतीच्या प्रवासात गावी येणाऱ्या चाकरमान्यांची स्पेशलमुळे गैरसोय दूर होणार आहे.
- सुरळीत वेळापत्रकाने चाकरमान्यांना दिलासा
कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह होळी स्पेशल शुक्रवारीही नियोजित वेळेत मार्गस्थ झाल्याने चाकरमान्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. एलटीटी-मडगाव स्पेशल १ तास ४० मिनिटे विलंबाने यावली. हा अपवाद वगळता सर्वच गाड्या निर्धारित वेळेत रवाना झाल्याने विलंबाच्या प्रवासातून चाकरमान्यांची सुटका झाली.
- कोईमतूर-हिसार एक्सप्रेसला २ अतिरिक्त थांबे मंजूर
कोकण मार्गावरून धावणाऱ्या कोईमतूर-हिसार एक्सप्रेसला कुमठा आणि कुंदापुरा रेल्वे स्थानकात प्रायोगिक तत्त्वावर २ अतिरिक्त थांबे मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार २२४७६/२२४७५ क्रमांकाची कोईमतूर-हिसार एक्सप्रेस १५ मार्चपासून दोन्ही स्थानकांदर थांबणार आहे. यापाठोपाठ २२६५३/२२६५४ क्रमांकाची तिरुवअनंतपुरम-निजामुद्दीन एक्सप्रेस व २२६५५/२२६५६ क्रमांकाची निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्सप्रेसही कुंदापुरा स्थानकात थांबणार आहे. यामुळे प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने दिलासा मिळाला आहे.