Maid Theft Case Kolhapur: प्रियकराच्या मदतीने 2 घरफोड्या, मोलकरणीचा साडेबारा तोळे सोन्यावर डल्ला
पोलिसी खाक्या दाखवताच तिने पिसे यांच्या घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली
कोल्हापूर : घरकामासाठी येणाऱ्या महिलेने प्रियकराच्या मदतीने दोन घरफोड्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी मोलकरीण गायत्री अनिल पाटील (वय 40, रा. टेंबलाई नाका, कोल्हापूर) आणि तिचा प्रियकर सुनील संभाजी जाधव (वय 42, रा. घोडके चाळ, टेंबलाई नाका) या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीतील साडेबारा तोळे दागिने पोलिसांनी हस्तगत केले, अशी माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईक्स एक्स्टेंशन परिसरातील लोहिया मार्ग येथे सिद्धीविनायक हाईट्समध्ये राहणाऱ्या वृषाली शिवकुमार पिसे (वय 46) यांच्या घरातून आठ तोळे दागिन्यांची चोरी झाली होती. हा प्रकार 25 मे ते 2 जून दरम्यान घडला होता. चोरी झालेल्या कालावधीत पिसे यांच्या कुटुंबीयांशिवाय केवळ मोलकरणीचाच घरात वावर होता. त्यामुळे संशयावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करीत होती.
अखेर पोलिसी खाक्या दाखवताच तिने पिसे यांच्या घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली. तिच्या घरात झडती घेताना पोलिसांना सोन्याच्या बांगड्या मिळाल्या. त्याबद्दल विचारले असता तिने लोहिया मार्ग येथील आदित्य अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आशा विजयराज भोसले (वय 73) यांच्या घरातून चोरल्याची कबुली दिली.
तिने चोरीतील काही दागिने प्रियकर सुनील जाधव याच्याकडे दिल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी तीन तोळे वजनाचे सोन्याचे दोन तोडे, एक तोळे सोन्याचे कडे, दोन तोळ्dयाचा सोन्याचा हार, दीड तोळ्dयाचे कानातील टॉप्स, एक तोळ्याचे टॉप्स असा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक आकाश जाधव, अंमलदार मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, सुशीलकुमार गायकवाड, सनीराज पाटील, अमोल पाटील आदींच्या पथकाने गुह्याचा उलगडा केला.
पाटील, जाधव दोघेही सराईत चोरटे
गायत्री पाटील व सुनील जाधव हे दोघे सराईत चोरटे आहेत. सुनील जाधव याच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गायत्री पाटील हिच्यावरही 2014 मध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
टप्प्याटप्प्याने केली चोरी
गायत्री पाटील ही कामाच्या निमित्ताने घरी आल्यानंतर तिने ठराविक अंतराने दागिन्यांची चोरी केली. एकाचवेळी चोरी न करण्याची शक्कल तिने लढवली. तसेच चोरीचे दागिने सुनील जाधव याच्याकडे ठेवण्यास दिले.