‘मेड इन चायना’ पांडा
चीनी वस्तू स्वस्त असतात म्हणून त्या मोठ्या प्रमाणात विकत घेतल्या जातात, हे आपल्याला माहिती आहे. या वस्तूंच्या बनावटगिरीचा अनुभवही आपल्याला लगेचच येतो. कारण या वस्तू टिकत नाहीत. अंतिमत: त्या खरेदीदाराचा तोटाच करतात. म्हणूनच न टिकणाऱ्या किंवा नकली वस्तूंना ‘मेड इन चायना’ असे उपहासाने म्हटले जाते. आता हा नकली प्रकार प्राण्यांच्या संदर्भातही होत आहे.
हा प्रकार कुठल्या अन्य देशामध्ये नव्हे, तर प्रत्यक्ष चीनमध्येच होत आहे. पांडा हा प्राणी चीनचे वैशिष्ट्या म्हणून ओळखला जातो. या प्राण्याचे मूलस्थान चीनच असल्याचे मानले जाते. त्यामुळे पांडा पाहण्यासाठी चीनमध्ये प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने पर्यटक जातात. त्यामुळे चीनचा मोठा आर्थिक लाभ होतो. अशाच एका चीनी प्राणिसंग्रहालयात काही पांडा ठेवण्यात आलेले आहेत. ते पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दीही असते. तथापि, एक प्रसंग असा घडला की या पांडांचे आणि त्यांच्यासमवेत चीनचेही बिंग अचानक फुटले. कारण या पांडांपैकी एकाने अचानक भुंकण्यास प्रारंभ केला. पांडा या प्राण्याचा आवाज कुत्र्यासारखा कसा झाला, असे कोडे पर्यटकांना पडले. त्यावेळी हे उघड झाले ते ते खरे पांडा नसून कुत्र्यांनाच पांडासारखे रंगविण्यात आलेले आहे. हे रंगकाम इतके कौशल्याने केलेले होते की पाहणाऱ्याला ते खरे पांडा आहेत, असेच वाटत होते. तथापि, अखेर त्यांच्यापैकी एका पांडानेच आपण खरे कोण आहोत याचा खुलासा आपल्या भुंकण्यातून केला आणि चीनचा ‘नकलीपणा’ केवळ निर्जीव वस्तूंपुरताच मर्यादित नसून त्याने आता सजीवांनाही आपल्या कह्यात घेतले आहे, हे निर्विवादपणे सिद्ध झाले.