For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मद्यपानाने उन्मत्त झालेले यादव एकमेकांशी लढू लागले

06:00 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
मद्यपानाने उन्मत्त झालेले यादव एकमेकांशी लढू लागले
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, यादवांनी प्रभासला पोहोचल्यावर श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे स्नान, दान आदि सर्व विधी पार पाडले. भोजन केले. त्यानंतर त्यांनी मद्यपानाला सुरवात केली आणि थोड्याच वेळात ते झिंगु लागले. ‘मैरेयक’ नावाच्या मद्याची थोरवी अशी की त्याचे माधुर्य अत्यंत भारी असते. लहानथोर यादववीर त्या मद्याचे सेवन स्वेच्छेने आणि अत्यंत आदराने करू लागले. एकमेकांना आग्रह करू लागले. जे एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र होते ते मद्यपानाने मस्तवाल झाल्याने एकमेकांना टोचून बोलू लागले, एकमेकांची उणीदुणी काढू लागले. कृष्णमायेच्या परिणामाने त्यांची बुद्धी नष्ट झाली. बुद्धिमंत होते ते बुद्धिमंद झाले. आपली नातीगोती विसरून गेले. त्यामुळे एकमेकांना टोचून बोलण्यावर ते थांबले नाहीत तर अत्यंत क्रोध आल्याने हातात शस्त्रs घेऊन त्यांनी एकमेकांचा घात करण्यासाठी निर्वाणीचे युद्ध मांडले. यादवांच्यातले निशठ, उल्मुकादिक, शतजित्सहस्त्र, जिद्भानु आदि मुख्य मुख्य महावीर हेही चाललेले युद्ध पाहून खवळले. सर्वजण मद्यपानाने अतिगर्विष्ठ झाले होते. त्यातच कृष्णमायेने त्यांचे चित्त भरकटले होते. महामोहाने त्यांना भ्रांत केले होते.

ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ते एकमेकांचा घात करायला सहजी तयार झाले होते. ब्रह्मशापाची केवढी ख्याती! भाऊ भावांचे जीव घ्यायला तयार झाले. कृष्णमायेच्या प्रभावाने ते वाट चुकले आणि स्वजनांच्याबरोबर युद्ध करायला तयार झाले. याद्वाविरांची जात जरी एक असली तरी त्यांच्यात बारा आडनावे होती. ती ह्या प्रमाणे, दाशार्ह, सात्वक, अंधक, अर्बुद, माथुर, शूरसेन, कुंती, कुकुर, विसर्जन, मधु, भोज, वृष्ण्य असे बारा आडनावाचे ते यादववीर आपापसात लढू लागले. पूर्वी त्यांच्यापैकी कुणा एकाचा जरी कुणी अपमान केला तर तो समस्त यादवांचा अपमान समजून जीवाला जीव देऊन अपमान करणाऱ्याला ते वठणीवर आणत असत. आता मात्र तेच यादववीर एकमेकातली नातीगोती, बंधुभाव विसरून एकमेकांशी लढू लागले. पूर्वी ह्यापैकी कित्येकांच्या पायावर त्यांनी डोके ठेऊन आशीर्वाद घेतले होते पण आता मात्र ते त्यांचा जीवही घ्यायला तयार झाले. अगदी मुलांनी स्वत:च्या वडीलांनाही सोडले नाही की वडिलांनी मुलांची पर्वा केली नाही. भाऊभावाला विचारेनासा झाला. प्रत्येकाच्या मनात समोर दिसणाऱ्या प्रत्येकाशी प्राणपणाने लढून त्याला ठार कसे मारता येईल ह्याचेच विचार थैमान घालत होते. कृष्णमायेचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा बसलेला असल्याने त्यांच्या मनात चांगले काय, वाईट काय कशाकशाचा म्हणून विचार येत नव्हता. उलट आपण करतोय ते बरोबरच आहे ह्या विचाराने ते उन्मत्त होऊन एकमेकांना मारण्यासाठी एकमेकांच्या अंगावर धावून जात होते आणि परस्परांचा जीव घेत होते. बाप म्हणू नका, चुलता म्हणू नका, कुणाकुणाची त्यांनी पर्वा केली नाही. समोर दिसणाऱ्यापैकी कित्येकांनी त्यांना अंगाखांद्यावर खेळवले होते पण ह्या सर्वांचा त्यांच्या मुलांनी, पुतण्यांनी त्यांच्या डोक्यावर शस्त्रांचे घाव घालून घात केला. कन्येच्या मुलाला दोहित्र म्हणतात. त्याला तर आज्याच्या श्राद्धाचा अधिकारही असतो. त्या दोहीत्राने निष्ठुरपणे आज्याचा घात केला. मामाभाचे परस्परात निकराची लढाई करू लागले. मित्रामित्रानी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी घाव घातले. ब्राह्मणांच्या शापामुळे सर्वांचे आयुष्य एकाचवेळी संपायला आले होते. त्यामुळे सगळ्यांना काळसर्पाचे विष चढल्यासारखे झाले होते. सगळे मुर्खासारखे आपापल्या ज्ञातीबांधवांचा घात करायला टपले होते. इतके घनघोर युद्ध सुरु झाले की, सगळ्यांच्या भात्यातले बाण संपले. त्यासरशी धनुष्याच्या दांड्यांनी ते एकमेकांच्यावर घाव घालू लागले. त्यामुळे ते दांडे तुटून गेले.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :

.