बुद्धिबळ पटावरील ‘मॅड मॅन’...अर्जुन एरिगेसी !
मागील दोन वर्षांत बुद्धिबळात भारताचा डंका वाजलाय तो प्रामुख्यानं आर. प्रज्ञानंद नि डी. गुकेशमुळं. त्याच्या जोडीला आणखी एक नाव घ्यावं लागेल ते अर्जुन एरिगेसीचं...नुकतंच आपल्याला ऑलिम्पियाडमध्ये जे सुवर्ण हाती लागलं त्यात गुकेशइतकाच हात होता तो अर्जुनचाही. शिवाय जागतिक क्रमवारीत सध्याच्या घडीला त्याच्या इतक्या वरच्या स्थानावर दुसरा कुठलाच भारतीय खेळाडू पोहोचलेला नाहीये...
सतत सहा लढतींत विजयाचा झेंडा फडकविणं आणि सहा चेंडूंवर तितकेच षटकार खेचणं यांची जातकुळी तसं पाहिल्यास एकच...विचार केल्यास फारशी कठीण न वाटणारी, परंतु साध्य करण्यास अत्यंत दुर्धर अशी बाब...बुद्धिबळाच्या जगतात अशा अफलातून पराक्रमाची नोंद केली होती ती 1971 सालच्या जागतिक जेतेपदाच्या अंतिम फेरीतील खेळाडू ठरविण्यासाठी झालेल्या लढतीत अमेरिकेच्या प्रतिभावान बॉबी फिशरनं. त्यानं ‘कँडिडेट्स’ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मार्क तैमानोव्ह याचा 6-0 असा फडशा पाडला...पाच दशकांनंतर एका युवा भारतीय खेळाडूनं देखील तसाच पराक्रम नोंदविला तो हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं हल्लीच झालेल्या 45 व्या ऑलिम्पियाड स्पर्धेत...त्यानं सलग सहा वेगवेगळ्या खेळाडूंविरुद्धचे सामने जिंकले अन् भारतानं स्पर्धा देखील...नाव : अर्जुन एरिगेसी....
कित्येक विश्लेषक असं म्हणू शकतील की, अर्जुनचे प्रतिस्पर्धी फारसे बलाढ्या नव्हते. कारण त्यानं सध्या जागतिक बुद्धिबळात फार मोठा मान मिळविलाय नि त्याच्याशी तुलना केल्यास त्या सहा खेळाडूंचा दर्जा कमी वाटणं साहजिकच...तेलंगणच्या या ग्रँडमास्टरनं ऑलिम्पियाडमधील 11 लढतींपैकी 9 जिंकून व दोन बरोबरीत सोडवून 10 गुणांची नोंद केली अन् स्पर्धेत एकही पराभव न स्वीकारता तिसऱ्या पटावर वैयक्तिक सुवर्णपदक देखील गळ्यात घालून घेतलं. त्यानं पराभव केलेला सर्वांत बलवान खेळाडू होता तो अमेरिकेचा 2740 गुण मिळविणारा दुमिंगेझ पेरेझ लिनियर...सध्या 2792 ‘एलो’ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या अर्जुन एरिगेसीनं ऑलिम्पियाडमध्ये ते स्थान मिळविलं ते अमेरिकेच्या कारुआनाचा पराभव करून. त्यानं त्या एकाच स्पर्धेतून 14 ‘एलो’ गुणांची कमाई केली...
तेलंगणमधील वारंगल इथं 3 सप्टेंबर, 2003 या दिवशी जन्मलेल्या अर्जुननं विरंगुळा म्हणून बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला तो मित्रांसमवेत. तिरुपतीत शिकत असताना किंडरगार्टनमधील शिक्षकानं अर्जुन एरिगेसीच्या आई-वडिलांना विनंती केली ती त्याच्या बुद्धिबळ कौशल्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करण्याची. कारण त्याच्या रक्तातच कुठलीही गोष्ट पटकन आत्मसात करण्याची कला पुरेपूर दडलीय. त्याच्यात क्षमता आहे ती ‘मल्टिप्लिकेशन टेबल्स’ उलट्या पद्धतीनं म्हणण्याची. शिवाय 70 देशांच्या राजधान्या आणि त्यांची चलनं तो झोपेतून उठवून विचारल्यास देखील सांगू शकतो...अर्जुनचे न्युरोसर्जन असलेल्या वडिलांनी फारसा विचार न करता त्या शिक्षकाच्या सल्ल्यानुसार 11 वर्षांच्या आपल्या मुलाला पहिल्यांदा हणमकेंडा येथील ‘बी. एस. चेस अकादमी’ व त्यानंतर वारंगलमधील कोथापेठच्या ‘रेस अकादमी’मध्ये बुद्धिबळाचे धडे गिरविण्याकरिता दाखल केलं...
अर्जुन एरिगेसीनं झपकन उसळी घेतली ती 2017 नंतर...14 वर्षं 11 महिने आणि 13 दिवस वयाच्या त्या मुलानं फक्त सहा महिन्यांत ‘ग्रँडमास्टर’ किताब खिशात घातला. त्यानंतरच्या सहा महिन्यांत तो भारतातील सर्वांत ताकदवान युवा खेळाडू म्हणून उदयास आला. डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, निहाल सरिन, विदित गुजराथी यांचा समावेश असलेल्या ‘गोल्डन जनरेशन’चा तो महत्त्वाचा भाग असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये...64 चौकांनावर जबरदस्त हुकूमत मिळविलेल्या, डावपेच कोळून पिलेल्या अर्जुनला बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येक चालीमागं प्रतिस्पर्ध्याला झुंजविणं आवडतंय अन् त्याचं कधीही अंतिम निकालावर लक्ष नसतं. कदाचित त्यामुळंच की काय, महान मॅग्नस कार्लसननं त्याला ‘मॅड मॅन ऑन दि चेसबोर्ड’ असं नाव ठेवलंय...
विविध डावपेचांना वेगानं आत्मसात करण्यात निपुण असलेल्या अर्जुन एरिगेसीला कारकिर्दीत अजूनपर्यंत इस्रायलचे ग्रँडमास्टर व्हिक्टर मिखालव्हस्की, भारतातील सहकारी श्रीनाथ नारायणन आणि सध्याचे प्रशिक्षक व माजी ‘फिडे’ विजेते रुस्तम कासिमझानोव्ह यांचं मार्गदर्शन मिळालंय. रुस्तम यांनी विश्वनाथन आनंद, फाबियानो कारुआना नि कर्जाकिन यांनाही साहाय्य केलंय. अर्जुनला अतिशय आवडतंय ते ‘ऑनलाईन’ बुद्धिबळातील विविध चालींचा अभ्यास आणि वेगवेगळ्या प्रशिक्षकांची चर्चा करणं. त्याला कठीण परिस्थितीतून कशी सुटका करायची याचं ज्ञान जन्मत:च असून अर्जुनला ‘फायटर’ म्हणूनच सर्व जण ओळखतात. शिवाय त्याचा डाव संपतो तेव्हा घड्याळात बराच वेळ शिल्लक राहिलेला असतो हे विशेष...
काही वर्षांपूर्वी सर्वांनी लक्ष केंद्रीत केलं होतं ते निहाल सरिन, गुकेश व प्रज्ञानंदवर. पण कुठलाही आवाज न करता अर्जुन एरिगेसी या नावानं अवघ्या दोन वर्षांत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारलीय. शिवाय माजी जगज्जेता विश्वनाथ आनंदला देखील मागं टाकलंय...अर्जुनच्या बुडापेस्टमधील खेळानं झलक दाखविलीय ती भविष्यात तो किती मोठी भरारी घेऊ शकतो त्याची. गॅरी कास्पारोव्हचा फार मोठा चाहता असलेल्या अर्जुनला विश्वनाथन आनंदप्रमाणं जागतिक क्लासिकल जेतेपद भारतात खेचून आणायचंय...त्याला काही महिन्यांपूर्वी झालेल्या कँडिडेट्स स्पर्धेत चीनचा सध्याचा जगज्जेता डिंग लिरेनवर चढाई करण्याची संधी गुकेशनं दिलेली नसली, तरी येऊ घातलेल्या दिवसांत हे चित्र 360 अंशांत बदलू शकेल...
गेल्या दोन वर्षांतील अर्जुन एरिगेसीच्या अभूतपूर्व खेळानं त्याला 2800 च्या काठावर पोहोच्sाविलंय अन् असा पराक्रम गाजविल्यास हा टप्पा गाठणारा तो केवळ दुसरा भारतीय ठरेल. शिवाय विश्लेषकांच्या मते, त्यानं सातत्य राखल्यास एक दिवस तो जागतिक जेतेपद मिळवेल हे 100 टक्के नक्की...एक मात्र खरं की, अर्जुन एरिगेसी नावाचा ‘मॅड मॅन ऑन दि चेस बोर्ड’ सध्या त्याच्या खेळाची जादू विश्वाला दाखविण्यात कमालीचा रंगलाय !
अर्जुनचे अन्य‘लक्ष्यभेद’...
- 2021 : ‘गोल्डमनी एशियन रॅपिड चेस टूर’साठी पात्र ठरलेला पहिलावहिला भारतीय...त्याच वर्षी ‘टाटा स्टील इंडिया’ बुद्धिबळ स्पर्धेतील रॅपिड विभागात जेतेपद...
- 2022 : जानेवारी महिन्यात अर्जुननं पुन्हा ‘टाटा स्टील चेस चॅलेंजर’ स्पर्धा जिंकून ‘क्लासिकल फॉर्मेट’च्या पहिल्या 100 खेळाडूंत स्थान मिळविलं...मग मार्चमध्ये भारतीय राष्ट्रीय जेतेपद नि डी. गुकेश, हर्षा भारतकोटी यांच्यावर मात करून दिल्ली खुल्या स्पर्धेचा किताब...ऑगस्ट महिन्यात जिंकला तो अबुधाबी इंटरनॅशनल चेस फेस्टिव्हल, तर सप्टेंबरमध्ये पहिल्यांदाच 2700 ‘एलो’ गुणांचा टप्पा पार...डिसेंबर महिन्यात ‘टाटा स्टील’ बुद्धिबळ स्पर्धेतील ब्लिट्झ विभागाचं जेतेपद. एकूण तीन वेळा त्यानं या स्पर्धेच्या विविध गटांतील अजिंक्यपद खेचून आणलंय...
- 2024 : एप्रिलमध्ये मॅनोर्का ओपन ए स्पर्धेचा किताब खात्यात. त्यानंतर स्टीपन आवायगान स्मृती स्पर्धेचं जेतेपद...
हुकलेल्या ध्येयांनी बदलला दृष्टिकोन...
- अर्जुन एरिगेसीनं अलीकडे निकाल, क्रमवारी नि रेटिंगचा पिच्छा करण्यापासून स्वत:ची सुटका करून घेतलीय. काही प्रमुख ध्येयं हुकल्यानंतर आलेल्या निराशेतून हा बदल जन्मास आलाय अन् या दृष्टिकोनाचा त्याला चांगलाच फायदा देखील मिळालाय...तो डिसेंबर, 2023 मध्ये जागतिक क्रमवारीत होता 30 व्या क्रमांकावर. तेथून ‘लाईव्ह रेटिंग’मध्ये तिसरं स्थान ही भरारी काय दर्शविते ?...
- अर्जुन यंदाच्या मार्च महिन्यात चीनमध्ये असताना ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये भारताचा अग्रस्थानावरील खेळाडू बनला. 1 एप्रिल रोजी त्याच्या पराक्रमावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झालं. ‘फिडे’कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमवारीत त्यानं विश्वनाथन आनंदला मागं टाकलं आणि अशी कामगिरी करणारा तो डी. गुकेशनंतरचा दुसरा भारतीय ठरलाय..
- पण त्याला सलतंय ते ‘कँडिडेट्स’ आणि विश्वचषकातील अपयश...‘कँडिडेट्स’ स्पर्धेत आणि ‘विश्वचषका’त प्रज्ञानंदच्या जागी मी सहज असू शकलो असतो. पुन्हा ‘ग्रँड स्विस’मध्ये (नोव्हेंबर, 2023) हिकारू नाकामुरा किंवा विदित गुजराथीऐवजी मी असू शकलो असतो. मी त्याच्या खूप जवळ पोहोचलो होतो. पण माझी खूप काळजी करण्याची प्रवृत्ती ही समस्या होती. म्हणूनच मी केवळ माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतलाय, निकालावर नव्हे’, अर्जुन म्हणतो...
- ‘कँडिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरता न येणं हे अर्जुन एरिगेसीला बरंच दुखावून गेलं. मग तो दोन आठवड्यांसाठी बुद्धिबळापासून पूर्णपणे दूर राहिला अन् परत आला तो बदललेल्या मानसिकतेसह...शिवाय गेल्या वर्षीच्या जानेवारीपासून त्यानं शारीरिक दिनचर्येमध्येही सुधारणा केलीय. त्यासाठी अर्जुननं वैयक्तिक प्रशिक्षकाची नियुक्ती केलीय अन् तो त्याच्या फिटनेसबद्दल अधिक जागरूक बनलाय...
- राजू प्रभू