30 शहरांमध्ये मॅक्रोटेक डेव्हलपर्स करणार विस्तार
पुणे :
घर बांधणीसाठी आवश्यक असणाऱ्या प्लॉटस्च्या वाढत्या मागणीची दखल घेत मॅक्रोटेक डेव्हलपर्सने (पूर्वाश्रमीची लोढा) पुढील वर्षी मार्चपर्यंत 30 शहरांमध्ये आपला व्यवसायाचा विस्तार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनी आपल्या धोरणानुसार 13 नव्या शहरांमध्ये प्रकल्पांसाठी जागा खरेदीची योजना आखत असल्याचे समजते. कंपनीचे संस्थापक अभिनंदन लोढा यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, या आर्थिक वर्षात 2200 कोटी रुपयांचे प्लॉटस् विकण्याचे नियोजन केले जात असून 2029-30 वर्षांपर्यंत वार्षिक 10हजार कोटी रुपयांच्या प्लॉटस्ची विक्री करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
विविध राज्यात जागा खरेदी
वेगवेगळ्या राज्यांमध्ये कंपनीने 17 ठिकाणी जागा खरेदी केल्या आहेत. पैकी 10 ठिकाणी जागेवर प्रकल्प विकासाचे काम हाती घेण्यात येत आहेत. महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये कंपनी आपले प्रकल्प राबवित आहेत.
48 शहरात प्लॉट खरेदी
महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये 10 शहरांमध्ये एक हजार एकरच्या विस्तीर्ण जागेमध्ये प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. कंपनी प्लॉटस्ची विक्री मात्र ऑनलाईनमार्फतच करत असल्याचे अभिनंदन लोढा यांनी म्हटले आहे. प्लॉट खरेदी करून विकसित करण्यासाठी कंपनीने 48 शहरांचा विचार केला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.