For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाजगोळीत 1.13 कोटीच्या ड्रग्जसह यंत्रसामग्री जप्त

06:58 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
हाजगोळीत 1 13 कोटीच्या ड्रग्जसह यंत्रसामग्री जप्त
Advertisement

मुख्य आरोपीसह आठ संशयित ताब्यात : चार दिवसांच्या गुप्त पाहणीनंतर अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

Advertisement

त. भा. वार्ताहर

तुडये : चंदगड तालुक्यातील हाजगोळी-सरोळी गावादरम्यानच्या शेतवडीतील पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू असलेला एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज निर्मितीचा कारखाना अमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त केला. रविवारी रात्री करण्यात आलेल्या या धडक कारवाईत सुमारे 208 ग्रॅम तयार एमडी ड्रग्स, त्याच्या निर्मितीसाठी लागणारी रसायने, प्रयोगशाळेसदृश साहित्य आणि विविध यंत्रसामग्री असा तब्बल 1 कोटी 13 लाख 51 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुख्य आरोपीसह पोल्ट्री फार्म मालक व अन्य संशयित अशा एकूण आठ जणांना तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने चंदगडसह कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा सीमाभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, पुणे यांच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. गेल्या चार दिवसांपासून पथकातील अधिकारी व कर्मचारी साध्या वेशात परिसरावर नजर ठेवून होते. संशयास्पद हालचालींची खात्री झाल्यानंतर रविवारी रात्री हाजगोळी-सरोळी मार्गावरील पोल्ट्री फार्मवर छापा टाकण्यात आला.  पोल्ट्री फार्ममध्ये एमडी ड्रग्सची निर्मिती केली जात असल्याचे कारवाईत उघडकीस आले.

208 ग्रॅम तयार एमडी, रसायने व यंत्रसामग्रीचा मोठा साठा

छाप्यात सुमारे 208 ग्रॅम वजनाचा तयार एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स आढळून आला. त्याचबरोबर ड्रग्स निर्मितीसाठी वापरली जाणारी विविध रसायने आणि साहित्यही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. यामध्ये रासायनिक पावडर, सुमारे 70 लिटर रसायन, फिल्टर पेपर, डिजिटल थर्मामीटर, घनतामापक, टेस्ट ट्यूब, काचेचे जार, इंडिकेटर पेपर, कापडी हँड ग्लोव्हज, स्पीड कंट्रोल रेग्युलेटर, मिक्सिंग मोटार, स्टँडिंग सेट आणि अन्य उपकरणांचा समावेश आहे.

जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा नेमका वापर कशासाठी केला जात होता, त्यातून किती प्रमाणात एमडी तयार करण्यात आले आणि या कारखान्यात यापूर्वी किती काळापासून निर्मिती सुरू होती, याचा तपास पथकाकडून करण्यात येत आहे.

चार दिवस साध्या वेशात पाहणी

कारवाईपूर्वी अमली पदार्थविरोधी पथकाने हाजगोळी-सरोळी परिसरात सलग चार दिवस गुप्तपणे पाहणी केली. पोल्ट्री फार्ममध्ये रात्रीच्या वेळी होणाया संशयास्पद हालचाली, ये-जा करणाऱ्या व्यक्ती आणि वाहनांवर पथकाने बारकाईने लक्ष ठेवले. पुरावे व माहितीची खात्री झाल्यानंतर शनिवारी रात्री छापा टाकण्यात आला.

या कारवाईत मुख्य आरोपीसह पोल्ट्री फार्म मालक आणि अन्य संशयितांना ताब्यात घेण्यात आले. तुडये परिसरातील दोन, हाजगोळीतील एक तसेच बेळगाव परिसरातील दोन जणांसह अन्य संशयितांची चौकशी सुरू आहे. एकूण आठ संशयित ताब्यात असल्याचे सांगण्यात आले.

निर्मनुष्य ठिकाणाचा घेतला फायदा

हाजगोळी-सरोळी दरम्यानचा हा परिसर तुलनेने निर्मनुष्य असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकही होत नाही. स्थानिक शेतकरी शेताकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये नेमके काय सुरू आहे, याची पुसटशी कल्पनाही परिसरातील नागरिकांना नव्हती. याचा फायदा घेत ड्रग्ज निर्मितीचा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. पोल्ट्री फार्ममध्ये अमली पदार्थ तयार केला जात असल्याचे उघड झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा कनेक्शनची शक्यता

हाजगोळी हे कर्नाटक सीमेच्या जवळ असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बेळगाव हद्दीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून, जांबोटीमार्गे गोवा राज्याशीही संपर्क सुलभ आहे. त्यामुळे येथे तयार होण्राया एमडी ड्रग्जचा पुरवठा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांमध्ये केला जात होता का, याची दिशा तपासण्यात येत आहे.

ड्रग्जची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा पुरवठा, आर्थिक व्यवहार, वाहतूक व्यवस्था आणि संभाव्य विक्री साखळी यांचा तपास पथकाकडून केला जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे अन्य शहरांपर्यंत पोहोचण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मुख्य आरोपी इरफान खानचा सहभाग; तपासाला वेग

नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 102/2026 अन्वये एनडीपीएस कायद्यातील कलम 8(क), 21(क), 22(क) तसेच बीएनएसमधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान सलीम खान (रा. मिरारोड, ठाणे), पोल्ट्री मालक पप्पू विठ्ठल मलतवाडकर याच्यासह इतर सहभागींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.

जप्त करण्यात आलेल्या रसायनांचे नमुने, तयार एमडी, उपकरणे आणि अन्य साहित्याची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यात येत आहे. कोल्हापूर येथून फॉरेन्सिक पथकाच्या दोन वाहनांतून अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी जप्त साहित्याची तपासणी करून आवश्यक नमुने घेत अहवालासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या अहवालातून जप्त पदार्थांचे स्वरूप आणि त्यांचा वापर याबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

वरिष्ठ आयपीएस अधिकारी अधीक्षक एम. एम. मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील आणि चंदगडचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी कारवाईदरम्यान आवश्यक बंदोबस्त ठेवला. पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन बोधे करीत आहेत.

रविवारी रात्री सुरू झालेली ही कारवाई सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होती. सीमाभागातील एका शांत आणि दुर्लक्षित ठिकाणी एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या कारखान्यामागे आणखी कोणाचा हात आहे, तयार ड्रग्ज कुठे आणि कोणाला पुरवले जाणार होते, रसायने कोठून आणली जात होती आणि महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा या राज्यांमध्ये या नेटवर्कचे जाळे किती विस्तारले आहे, याचा उलगडा पोलीस तपासातून होणार आहे.

Advertisement
Tags :

.