For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मच्छे-वाघवडे रस्त्याचे कामकाज रखडले

10:53 AM Mar 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
मच्छे वाघवडे रस्त्याचे कामकाज रखडले
Advertisement

दुरुस्तीकडे प्रशासनाचे पुन्हा दुर्लक्ष : वाहनधारकांना त्रास, रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी

Advertisement

वार्ताहर/किणये

तालुक्याच्या पश्चिम भागातील मच्छे ते वाघवडे रस्त्यांच्या डांबरीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यात खड्डे व चिखल तर उन्हाळ्यात धूळ-मातीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. अनेकवेळा प्रशासनाकडे या रस्त्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे. अखेर महिन्याभरापूर्वी मच्छेपासून सुमारे एक ते दीड किलो मीटर अंतरापर्यंत रस्त्याचे कामकाज करण्यासाठी रस्ता पूर्णपणे उखडून ठेवण्यात आला. मात्र सध्या या रस्त्याकडे पुन्हा दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Advertisement

मच्छे ते वाघवडे हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून रोज मच्छे, वाघवडे, संतिबस्तवाड, काळेनट्टी, तीर्थकुंडये आदी गावातील वाहनधारकांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. तसेच वाघवडे रस्त्याच्या बाजुला मोठमोठे कारखाने आहेत. यामुळे या कारखान्यांना ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची संख्याही अधिक असते. हा रस्ता महत्त्वाचा असूनही रस्त्यांचे कामकाज का रखडले? असा सवाल या भागातील कारखानदार व नागरिक करू लागले आहेत. मच्छे येथील हावळनगरजवळ पावसाळ्यात रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला होता. तर गटारीमधून येणारे पाणी थेट रस्त्यावरून जात होते.

तसेच सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे मच्छेहून वाघवडे गावाला जायचे म्हणजे मोठी कसरतच करावी लागत आहे. म. ए. युवा समिती यांच्या माध्यमातून या रस्त्यासंदर्भात अनेकवेळा आवाज उठविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदनही देण्यात आले आहे. महिन्याभरापूर्वी मच्छे येथून एक ते दीड किलो मीटर अंतरापर्यंत रस्ता उखडून ठेवला आहे. त्यामुळे सध्या या रस्त्यावरून ये-जा करीत असताना अनेक दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाले आहेत.

अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी या रस्त्यावर अनेक अपघात घडलेले आहेत. मच्छे गावातील एक बैलगाडीसुद्धा रस्त्यावर पडली होती. सुदैवाने शेतकरी व बैलजोडी बचावली होती. औद्योगिक कारखाने असल्यामुळे रात्रीच्यावेळी कामगार वर्गाची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र उखडून ठेवलेल्या रस्त्यामुळे व खड्ड्यांमुळे कामगार वर्गाला रात्रीच्यावेळी कारखान्याला ये-जा करणे मुश्किल झाले आहे, अशी माहिती कामगार वर्गाने दिली आहे.वाघवडे गावाजवळील मुंगेत्री नदीच्या पुलावरील रस्ता खचलेला आहे.  त्याचबरोबर गावच्या प्रवेशद्वारानंतरचा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे.

रस्त्यावरील दगडांमुळे वाहनधारक हैराण

रस्त्याचा काही भाग उखडून ठेवलेला आहे. त्यामुळे रस्त्यावरील दगड बाहेर पडलेले आहेत. चारचाकी वाहतूक होत आहे. मात्र दगडांमुळे दुचाकी चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का झाले आहे? गेल्या पाच-सहा वर्षांपासून आम्ही या रस्त्यांच्या डांबरीकरणाची मागणी करीत आहोत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्यांचे कामकाज त्वरित करावे.

 - अभिषेक चलवेटकर, मच्छे

Advertisement
Tags :

.