एम. व्ही. हेरवाडकर संघाकडे फाऊंडर वीक चषक
झेवियर्स उपविजेता : वरुण पुजारी उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट गोलरक्षक समर्थ कागलकर
बेळगाव : फिनिक्स स्कूल आयोजित फाऊंडरवीक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या 17 वर्षांखालील माध्यमिक गटाच्या अंतिम सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने सेंट झेवियर्स संघाचा 1-0 असा पराभव करून फिनिक्स फाऊंडर वीक चषक पटकाविला. वरुण पुजारी उत्कृष्ट खेळाडू तर समर्थ कागलकरला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. होनगा येथील फिनिक्स स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हेरवाडकर संघाने सेंट पॉल्सचा टायब्रेकरमध्ये 4-3 असा पराभव केला.
या सामन्यात हेरवाडकर संघाने गोल करण्याचे बरेच प्रयत्न केले. पण सेंट पॉल्सच्या बचाव फळीने त्यांचे सर्व प्रयत्न परतावून लावले. दुसऱ्या सत्रात सेंट पॉल्सने आपल्या छोट्या पासद्वारे आक्रमक चढाया केल्या. पण हेरवाडकरच्या बचावफळी व गोलरक्षकाने उत्कृष्ट कामगिरी करत सर्व प्रयत्न निष्फळ ठरविले. निर्धारीत वेळेत गोलफलक कोरा राहिल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये हेरवाडकरने 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने कनक मेमोरियल संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 25 व्या मिनिटाला झेवियर्सच्या संकेतच्या पासवर हुजियरने गोल करून 1-0 ची आघाडी झेवियर्सला मिळवून दिली. त्यानंतर कनक मेमोरियलने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले.
अंतिम सामना सेंट झेवियर्स व एम. व्ही. हेरवाडकर यांच्यात झाला. या सामन्यात हेरवाडकरने 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ते असफल ठरले. दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला लक्ष्य खतायतच्या पासवर अथर्व सोमण्णाचेने गोल करून 1-0 ची आघाडी हेरवाडकरला मिळवून दिली. त्यानंतर झेवियर्सने गोल करण्यासाठी प्रयत्न केले. पण ते असफल ठरले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे मनोज मायकल, राजेंद्रन यांच्या हस्ते विजेत्या एम. व्ही. हेरवाडकर व उपविजेत्या सेंट झेवियर्स संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फॉरवर्ड-समर्थ एच. केएलई, उत्कृष्ट डिफेंडर- अनिकेत पाटील झेवियर्स, उगवता खेळाडू-साईश फ्रान्सिस डी., उत्कृष्ट गोलरक्षक- समर्थ कागलकर कनक तर उत्कृष्ट खेळाडू-वरुण पुजारी झेवियर्स यांना चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महांतेश गवी व अरुण कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.