For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म. ए. समितीने घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट

07:30 AM Jun 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
म  ए  समितीने घेतली उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट
Advertisement

सीमाप्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेटीचे आश्वासन

Advertisement

 त. भा. प्रतिनिधी

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते शनिवारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते, त्या हॉटेलसमोर समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकारदेखील घडला.

Advertisement

बेळगाव, भालकी, निपाणी, कारवारसह मराठी भाषिक भागांचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने पुन्हा एकदा जोरकसपणे मांडली. सीमाभागातील जनतेला न्याय मिळावा आणि प्रलंबित सीमाप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सीमाप्रश्नासंदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारने या प्रकरणात प्रतिवादी म्हणून भूमिका घेत  प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रश्नात लक्ष घालून तो मार्गी लावावा, अशी विनंती केली. सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना आणि न्यायाच्या मागणीचा विचार करून केंद्राने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याची माहिती समितीच्या नेत्यांनी दिली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, मालोजी अष्टेकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.