कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लुथरा बंधूंच्या आवळल्या मुसक्या

02:54 PM Dec 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

थायलँड येथील रिसॉर्टमधून केली अटक : दोघानांही सीबीआय आणणार भारतात,पहाटे साडेचार वाजता पोहोचणार मुंबईत,लुथरांसह आतापर्यंत 7 जणांना अटक,हडफडे 25 जणांचे जळीतकांड प्रकरण

Advertisement

पणजी, म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये शनिवार दि. 6 डिसेंबर रोजी रात्री लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतातून पळून गेलेले या क्लबचे मालक दिल्लीतील रहिवासी सौरभ व गौरव लुथरा या बंधूंना थायलँडमधील फुकेत बेटावरील रिसॉर्टमधून अटक करण्यात आली आहे. लुथरा बंधूंवर 25 जणांचे खून आणि निष्काळजीपणाचा आरोप लावण्यात आला असून सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू झाला आहे. लुथरा बंधूंना आणण्यासाठी भारतीय सीबीआय अधिकाऱ्यांचे पथक थायलँडला रवाना झाले आहे. त्याचबरोबर गुरुवारी दिवसभरात घडलेल्या घटनांमध्ये दिल्लीत रोहिणी न्यायालयाने यांचा संरक्षण अर्ज फेटाळला. म्हापसा न्यायालयाने ‘बर्च’चा भागीदार अजय गुप्ताला सात दिवसांची पोलिस कोठडी फर्मावली.

Advertisement

हणजूणचे सरपंच रोशन रेडकर, पंचायत सचिव रघुवीर बागकर यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. ‘ऑल इंडिया लॉयर्स युनियन’च्या गोवा शाखेने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन गोवा मानवाधिकार आयोगाने राज्याचे मुख्य सचिव डॉ. कंदवेलू तसेच पोलिस महासंचालक आलोक कुमार यांना नोटिसा बजावल्या आहेत. येत्या 24 तासांच्या आत लुथरा बंधूंना भारतात आणले जाईल. थायलंडला गेलेले सीबीआयचे पथक लुथरा बंधूंना घेऊन आज शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान भारतात म्हणजेच मुंबईत पोहोचणार आहे. त्यांना घेऊन येणारे विमान  मुंबई विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर कायदेशीर सोपस्कर पूर्ण करुन लुथरा बंधूंना गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

बर्च क्लबमधील शनिवारी रात्रीच्या अग्नितांडवानंतर त्या पहाटेच लुथरा बंधूंनी दिल्लीतून 6 ई 1073 या विमानाने थायलँडला पलायन केले होते. त्यानंतर गोवा सरकारने त्वरित केंद्र सरकारला कळविल्यानंतर, भारत सरकारने ‘इंटरपोल’शी संपर्क साधला. इंटरपोलने भारत सरकारच्या सूचनेवर त्वरित कारवाई करत लुथरा बंधूंच्या विरोधात ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी केली होती. महत्त्वाचे म्हणजे घटनेच्या अवघ्या दोन दिवसांत ही नोटीस जारी करण्यात आली. सर्वसाधारणपणे या नोटिशीच्या प्रक्रियेला एक आठवडा किंवा त्याहून अधिक वेळ लागते, परंतु भारत सरकार तसेच सीबीआयच्या जलद कार्यवाहीमुळे ही प्रक्रिया खूप लवकर पूर्ण होणे शक्य झाले. त्यामुळे घटनेच्या अवघ्या पाच दिवसांच्या आत थायलँडमध्ये पळून जाऊन लपून बसलेल्या लुथरा बंधूंच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. या जळीतकांडप्रकरणी आतापर्यंत क्लबच्या पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती, त्यात आता लुथरा बंधूंनाही अटक झाल्यामुळे एकूण सात जणांना अटक झाली आहे.

लुथरांना शिक्षा देण्यात कुठलीच कमतरता राहणार नाही : मुख्यमंत्री

लुथरा बंधूंना कायदेशीर मार्गाने जी शिक्षा आहे, ती देण्यात येईलच. त्यामध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. लुथरा बंधूंना थायलँडमधून परत आणण्यासाठी गोवा पोलिसांनी केंद्रीय तपास संस्थांशी समन्वय साधला आहे. बर्च नाईट क्लबमध्ये झालेल्या आगीच्या घटनेच्या चौकशीत प्रगती होत आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या मदतीने लुथरा बंधूंना थायलँडमध्ये अटक केली आहे. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत लुथरा बंधूंचे पासपोर्ट रद्दची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या बंधूंची बँक खातीही गोठविली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article