काम हा ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी असतो
अध्याय तिसरा
भगवंत म्हणाले, रजोगुण वाढला की, काम आणि क्रोध हे मोठे खादाड आणि पापिष्ट वैरी जोर करतात आणि त्यामुळे मनुष्य पापाचरण करण्याला तयार होतो. काम-क्रोधाच्या ठिकाणी अंशमात्रसुद्धा दयाबुद्धी नाही. ते काळाप्रमाणेच निष्ठुर आहेत. त्यांच्यात तमोगुणाची प्रमाद व मोह ही वैशिष्ट्योही असतात. काम क्रोध हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत.
ज्ञानाच्या पंक्तीला ते राहत असतात. सर्वसाधारणपणे ते कोणाच्या आटोक्यात येत नाहीत. धुराने अग्नी आच्छादित होतो किंवा मळाने आरसा झाकून जातो अथवा वारेने गर्भ वेष्टित असतो, त्याप्रमाणे काम माणसाच्या ज्ञानाला झाकून टाकतो. काम, क्रोधाचा घट्ट विळखा विशेषत: ज्ञानाभोवती पडलेला असतो. असंही म्हणता येईल की, ज्याप्रमाणे बी कोंड्यासकट उत्पन्न होते त्याप्रमाणे ज्ञानही कामक्रोधाशिवाय जन्मच घेत नाही.
काम आणि क्रोधाबद्दल अधिक सांगताना पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, काम आणि क्रोध हे कधीही तृप्त न होणाऱ्या अग्नीप्रमाणे असून ते ज्ञानी माणसाचे कायमचे वैरी होत.
काम-रूप-महा-अग्नि नव्हे तृप्त कधी चि जो । जाणत्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकिले ।। 39 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, काम हा ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी असतो. त्याने त्यांचे ज्ञान वेढलेले असते आणि त्याचे निर्दलन होणे महाकठीण असते. वस्तुत: ज्ञान हे शुद्धच आहे परंतु या काम-क्रोधाने हे झाकले गेले आहे. म्हणून ते प्राप्त होण्यास कठीण झाले आहे. ह्यासाठी सुरवातीलाच साधनेने काम-क्रोधाला जिंकावे, म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होते. परंतु सामान्य माणूस या काम क्रोधाचा पराभव करू शकत नाही. ह्या काम-क्रोधांना जिंकण्यासाठी त्यांना दडपून ठेवावे, तर अग्नीला इंधन पुरवल्यावर अग्नी जसा अधिकच प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे दडपलेले काम, क्रोध अधिकच वेगाने उसळी मारून पुढे येतात.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात, इंद्रिये, मन व बुद्धी ह्यात काम व क्रोध राहतात. मन, बुद्धी, इंद्रिये यांचे द्वारा हा काम ज्ञानाला आच्छादित करतो आणि जिवात्म्याला मोहात गुंतवितो.
घेऊनि आसर्यासाठी इंद्रिये मन बुद्धि तो । मोह पाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गुंडुनी ।। 40 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अशा रीतीने जे जे उपाय करावेत, ते ते उपाय ह्या काम क्रोधांनाच साहाय्य करीत असतात म्हणून या जगामध्ये ते हठयोग्यांना सुद्धा जिंकतात. असे हे काम-क्रोध जिंकण्याला कठीण आहेत असे बोलले जरी जात असले, तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय तुला सांगतो.
पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, अर्जुना! तू प्रारंभी इंद्रियांचे नियमन करून ज्ञान आणि विज्ञान म्हणजे अध्यात्म आणि प्रपंच यांचा नाश करणाऱ्या पापरूपी कामाचा त्याग कर.
म्हणूनि पहिला थारा इंद्रिये ती चि जिंकुनी । टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्व हि ।। 41 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, या काम क्रोधांचे वास्तव्य इंद्रियांच्या ठिकाणी आहे. ही इंद्रिये माणसाला विविध विषयांचे आकर्षण दाखवत असतात. त्यामुळे ते विषय मिळवण्यासाठी ते माणसाला कर्म करायला भाग पाडतात. म्हणून प्रारंभी या इंद्रियांवर विजय मिळव.
पुढील श्लोकात मन, बुद्धी ह्यांच्या स्थानाबद्दल सांगून भगवंत पुढे म्हणतात, स्थूल देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म व श्रेष्ठ आहेत. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे. मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. बुद्धीच्याही पलीकडे तो परमात्मा आहे.
क्रमश: