For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वासनांधांना ठेचून काढले पाहिजे!

06:21 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
वासनांधांना ठेचून काढले पाहिजे
Advertisement

Advertisement

जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. ही ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारने खुप उत्कृष्ठ पद्धतीने निर्माण केली आहे. देशात प्रत्येकाला आपले अधिकार आणि हक्क असल्याने तो त्याचा वापर करीत असतो. अगदी एखादा नराधम विकृत आरोपी देखील आपल्या अधिकारांचा वापर त्याच्या संरक्षणासाठी करीत असतो. नेमका याचाच गैरफायदा घेत अनेक विकृत नराधम सुस्साट सुटलेत. अगदी चिमुरड्यापासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत अनेकांच्या शरीराचे लचके तोडले जात आहेत. यामुळे अशा वासनांधांना वेळीच ठेचण्याची आवश्यकता आहे.

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले! जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. ना कशाची चिंता ना कशाचा लोभ! आयुष्याचा सार यांना समजलेला नसतो. आपल्या छोट्याशा परिघात आपले मस्त मौला जीवन जगत असतात. खेळण्या-बागडण्याचे वय आणि दिवस यातच ते निरागस फुल रममाण असते. मात्र याच फुलाच्या संवेदनशील मनावर आघात झाला तर ते फुल उमलण्याआधीच असे कोमेजुन जाते की ते पुन्हा फुलेल याची शाश्वती देता येत नाही. या छोट्याशा कळीवर आघात करण्याचे पाप आजुबाजुचे नराधमच करीत असल्याने अशा वासनांध प्रवृत्तीच्या नराधमांना वेळीच ठेचून काढण्याची आवश्यकता आहे. अन्यथा नसरापूर सारख्या घटना होतच राहणार. यासाठी आवश्यकता आहे ती जलद न्याय आणि निर्णयांची.

Advertisement

त्याबाबत राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार अत्यंत संवेदनशील आणि सतर्क आहे. सावज टप्यात आले की त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो. तसाच कार्यक्रम एक ना एक दिवस नसरापूर घटनेतील वासनांध नराधम भिमराव कांबळे याचा होणार. तेही न्यायाने. अवघी छोटीशी चिमुरडी खेळण्या-बागडण्याचे वय. आपल्याच तंद्रीत बागडत होती. मात्र याचा फायदा घेतला तो वृद्धावस्थेकडे झुकलेल्या 65 वर्षीय वासनांध भीमराव कांबळे याने. त्या गोंडस लहानगीला वासरू दाखवितो असे आमिष दाखवून जवळच्या गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला, मारहाण केली. त्रास सहन न झाल्याने त्या चिमुरडीने तिथेच प्राण सोडला. छोटेसे पिल्लु नराधम आणि वासनांधाच्या जबड्यात सापडल्याने तिची काय अवस्था झाली असेल याला शब्दही सापडत नाहीत. याची साधी कल्पना देखील करवत नाही. अंगावर शहारे आणि आतून संताप उफाळून येत आहे. असाच संताप नागरिकांचा झाला आणि त्यांनी पुणे-सातारा हायवे बंद केला. अशावेळी हा वासनांध नागरिकांच्या कचाट्यात सापडला असता तर त्याचा चौकडा नाही तर तो जिवानिशी केव्हाच गेला असता. मात्र जे काही करायचे ते कायद्याने करायचे. एकीकडे नागरिकांचा संताप तर दुसरीकडे संविधानाने बनविलेला कायदा. या घटनेमुळे राज्याचे मुख्यमंत्री व्याकुळच नाही तर त्यांचा देखील संताप झाला होता. त्यांनी पुणे पोलिसांना तत्काळ योग्य ते निर्देश देत परिस्थिती हाताळत वासनांध भिमराव कांबळेच्या मुसक्या आवळल्या.

वयाची साठी उलटलेली असताना देखील माज कमी न झालेल्या भिमराव कांबळेला बलात्कारप्रकरणी अनेकदा अटक झाली होती. अलीकडे तो पॅरोलवर जेलबाहेर आला होता. ज्यांना ज्यांना भिमराव कांबळेची करतुत माहिती होती ते सर्व त्याच्यापासून अंतर ठेवून होते. अगदी त्याची बायको मुलगा देखील त्याला सोडून राहत होते. भिमराव कांबळे पॅरोलवर बाहेर आलेले समजताच त्याच्या गावातील अनेक महिला घराबाहेर पडण्यास देखील घाबऊ लागल्या. तर त्याच्या नातेवाईकांनी शक्य तेवढे त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. कारण तेवढी विकृती या नराधमामध्ये ठासून भरलेली आहे. यापूर्वी देखील या नराधमाने 70 वर्षीय वृद्धेला आपल्या वासनेचा बळी बनविले होते. अशावर वेळीच कायदेशीर कारवाई सत्वर होण्याची गरज आहे. अशा घटना काही थांबल्या नाहीत. नसरापूर घटनेनंतर देखील पुणे जिल्हयात अशा तीने ते चार घटना उघडकीस आल्या.

एका आजोबाने तर आपल्या नातीला देखील सोडले नाही. अशा घटना ऐकल्या तर विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. माणुसकीच्या अंतर्मनात असलेली सर्व नाती-गोती संपली की काय? ज्यांना आपली नाळ समजत नाही की गोत्र समजत नाही. अक्षरश: माणुस आणि पशु यांच्यात फरक उरला काय? बोकडासारखी अवस्था माणसाची होण्यास सुऊवात झाली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आपण क्षणिक आग भागविण्यासाठी नेमके काय करतोय याचे थोडे देखील भान अशा नराधमांना राहिले नाही. असाच प्रकार गेल्या दोन वर्षापूर्वी बदलापूर येथील शाळेत घडला. यातील नराधम अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली. मात्र नियतीने या विकृताचा फासा उलटविला. पोलिसांवर हल्ला कऊन पसार होण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. हा एन्काऊंटर भलेही कायद्याच्या कचाट्यात सापडला. मात्र सामान्य नागरिकामध्ये आनंद होता. कारण या विकृताच्या अत्याचाराला ज्या घरातील बाळ बळी पडले, त्या कुटुंबावर काय ओढवले असेल हे इतरांना काय समजणार. तसाच आनंद भिमराव कांबळेचा कार्यक्रम झाल्यावर अनेकांना होईल.

कारण चिमुरड्यावर अत्याचार होणाऱ्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मध्यंतरी दादर येथील एका प्रसिद्ध शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलीबरोबर त्याच शाळेतील कॅन्टीन बॉयने महिलांच्या बाथरूममध्ये घुसून धमकी देऊन अनैसर्गिक कृत्य केले. त्या धक्क्यातून ती मुलगी शेवटपर्यंत सावरली नाही. तिने शाळेत जाणेच बंद केले. शाळांमधील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकार रोज कुठे ना कुठे घडत असतात. त्यात कधी शाळेतील शिपाई, पहारेकरी तर कधी स्कूल बस चालक, वाहक असहाय्य अल्पवयीन मुलींचे शोषण करताना आढळतात. समाजात अत्यंत आदरणीय म्हणून ओळखले जाणारे शिक्षकही मागे नाहीत. सुसंस्कृत शिक्षकांच्या कळपात वासनांध बोकडे दबा धऊन बसलेली असतात. यामध्ये महिला शिक्षक देखील काही कमी नाहीत. माहीम येथील प्रसिद्ध अशा महिला शिक्षिकेने आपल्या वासनेची आग विझविण्यासाठी दहावीत शिकणाऱ्या मुलाला बळी बनविले होते. या मुलाशिवाय ही महिला शिक्षिका राहत नव्हती. दहावीची परीक्षा झाल्यानंतर मुलाला ब्लॅकमेल करण्यापर्यंत या महिला शिक्षिकेची मजल गेली होती.

मात्र वेळीच हा प्रकार मुलाच्या पालकांच्या लक्षात आल्याने मुलगा वाचला. अन्यथा मुलगा आत्महत्येच्या विचारात होता. सध्या एकविसावे शतक आहे. जग मुठीत आल्याने संवाद वाढला, परंतु त्याचबरोबर विकृतीही वाढली आहे. अश्लील व्हिडीओ, ब्लू फिल्म्स पाहून भीमराव कांबळेसारखे विकृत आपला माज भागविण्यासाठी चिमुरड्यांचे बळी घेत चालले आहेत. मात्र अशा वासनांधांना वेळीच ठेचून काढले पाहिजे. जेणेकऊन असे कृत्य करण्याचा विचार करणाऱ्यांना देखील धडकी भरली पाहिजे.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.