For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लग्नाचे आमिष...मात्र लुबाडणुकीचे विष!

03:47 PM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
लग्नाचे आमिष   मात्र लुबाडणुकीचे विष
Advertisement

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लाखोंना लुटले : महाद्वार रोडच्या तरुणावर फिर्याद, पोलिसांची समेटाची भाषा

Advertisement

बेळगाव : सोशल मीडियावर झालेल्या परिचयाचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर एका 25 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर तिला धोका दिल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित युवकाविरुद्ध फिर्याद देण्यासाठी गेलेल्या तरुणीवरच अरेरावी करून शहापूर पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी एका 25 वर्षीय तरुणीने पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांची भेट घेऊन घडल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. महाद्वार रोड येथील ईश्वरसिंग बडगुज्जर (वय 32) या युवकाविरुद्ध तक्रार केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस आयुक्तांनी सूचना देऊनही शहापूर पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याची घटना घडली आहे.

सोशल मीडियावरील परिचयाचे प्रेमात रूपांतर

Advertisement

सोशल मीडियावर झालेल्या परिचयाचे प्रेमात रूपांतर झाले. त्या तरुणीच्या कुटुंबीयांविषयी व त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती घेऊन हळूहळू तिच्याकडून पैशांची मागणी केली. वडिलांनी जमीन विकलेले पैसे त्या तरुणीने ईश्वरसिंगला पाठविले. आईच्या निधनानंतर तिचे व आपले दागिनेही तिने ईश्वरसिंगला दिले. दागिने घरी ठेवले आहेत, ही गोष्ट कळल्यानंतर त्याने आपल्याशी सहानुभूतीपूर्वक वागणूक ठेवली. एकेदिवशी त्याने आपल्याला बोलावून आपल्यावर बळजबरी केली. याला विरोध करताच आपण तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगितले, असे पीडित तरुणीने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

160 ग्रॅम सोन्याचे दागिने व 19 लाख लुटले

आपल्याला पैशांची गरज आहे. त्यामुळे आठवडाभरासाठी पैसे घेऊन ये,असे सांगितल्यामुळे त्या तरुणीने त्याला दोन लाख रुपये दिले. तेवढ्यावर त्याची गरज भागली नाही. आठवडाभरानंतर त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. दोघे एकांतात असलेले व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. कार खरेदीसाठी म्हणूनही त्याने पैसे घेतले. तो मागेल तशी ती तरुणी त्याला पैसे देत गेली. एकूण 160 ग्रॅम सोन्याचे दागिने व 19 लाख रुपये देऊनही त्याचे समाधान झाले नाही. धमकावण्याचे प्रकार त्याने सुरूच ठेवले, असे पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारअर्जात सांगितले आहे.

3 कोटी रुपयांची मागणी

तरुणीने दिलेले सोन्याचे दागिने तारण ठेवून त्याने पैसे उचलले होते. त्या तरुणीने लग्न करून घे, अशी विनंती केल्यानंतर 3 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. या गंभीर स्वरुपाच्या तक्रारअर्जासोबत काही पुरावेही संबंधित तरुणीने पोलीस आयुक्तांकडे दिले आहेत. अॅड. मंदाकिनी अप्पुगोळ यांच्या मदतीने आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवण्यासाठी त्या तरुणीने धडपड सुरू केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याकडून सोन्याचे दागिने व लाखो रुपये घेऊन ब्लॅकमेल करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी समेट घडवून घेण्याचा सल्ला दिल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.  प्रकरण रविवारी पुन्हा पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचताच रविवारी रात्री एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

Advertisement
Tags :

.