लंचेनबी चानूने पटकाविले कांस्य
युथ ऑलिम्पिकमध्ये वुशू प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू
वृत्तसंस्था, डाकार
राजकुमारी लंचेनबी चानूने इतिहास घडवला. ती युथ ऑलिम्पिक गेम्समध्ये वुशू प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. तिने महिलांच्या चांगक्वान संयुक्त प्रकारात कांस्यपदक पटकावले.
मणिपूरच्या चानूने 18.039 गुण मिळवून तिसरे स्थान पटकावले. तिच्या पुढे इजिप्तची सोंडोस सोनबोल (18.660 गुण) आणि व्हेनेझुएलाची व्हॅलेरिया फ्रॅनेरिसडुडामेल (18.199 गुण) होत्या. चानूने चांगक्वान प्रकारात 9.316 गुणांसह दुसरे स्थान मिळवले. तर गुनशू प्रकारात तिने 8.723 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. डाकार युथ ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. सोमवारी, किशोरवयीन खेळाडू खुशबू रजाकभाईने रौप्यपदक पटकावले. अशी कामगिरी करणारी ती केवळ दुसरी भारतीय ज्युडोपटू ठरली आहे. त्याचवेळी जलतरणपटू धिनिधी देसिंगू हिने महिलांच्या 100 मी. फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक जिंकून आपली प्रभावी प्रगती सुरू ठेवली आहे.
