लाकूडतोड्या...
लहानपणी प्रामाणिकपणा शिकवण्यासाठी सर्व घराघरांमध्ये प्रामाणिक लाकूडतोड्याची गोष्ट आवर्जून सांगितली जायची. त्यामुळे बरेचदा आपण प्रामाणिक आहोत की नाही हे बघण्यासाठी मी अनेक विहिरींमध्ये तळ्यांमध्ये पैसे टाकून पाहिले, वस्तू टाकून पाहिल्या पण छे... तसे मुळीच घडलं नाही. त्यातच मध्यंतरी कृष्णदानाची गोष्ट मी वाचली... सत्यभामेला नारद सांगतात की आपल्याला जी गोष्ट खूप आवडते तिचं दान द्यायचं म्हणजे ते देवाला पावतं. आणि आपल्यातला प्रामाणिकपणा सिद्ध होतो. पण माझं मन मात्र द्रोपदीसारखं झालं होतं. मला लहानपणी आमच्या शेजारी पाहुणा म्हणून आलेला संजू नावाचा मुलगा खूप आवडला होता. पण लग्न मात्र वेगळ्याच मुलाशी झालं. नंतर ऑफिसमधल्या बॉसचा रुबाबदारपणा मला खूप भावला होता. असाच नवरा मिळायला हवा, असं सुद्धा माझ्या मनात येऊन गेलं होतं. नंतर चक्क देवाला गेल्यानंतर श्रीकृष्ण भगवानसुद्धा आपले पती असावे असाही विचार मनात येऊन गेला होता. पण आमचं हे बावळट ध्यान गळ्यात पडलं. ‘पदरी पडलं पवित्र झालं.’ या न्यायाने माझा संसार सुरू झाला होता. अशातच यांच्या एका मित्राच्या फार्म हाऊसवर ट्रिप निघाली होती. आंब्याची, नारळ, पेरू, चिकूची झाडं, चिंचा, आवळे अशा बागेत खूप मजा केली. आम्ही तर अगदी हरकून गेलो होतो.
या सगळ्यांच्याबरोबर पिठलं, भाकरी, भरीत, ठेचा, कांदा, मुळा असा लाजवाब मस्त बेत होता. जेवून खाऊन आम्ही अगदी तृप्त झालो होतो. त्यांच्या शेतात अगदी धनधान्य, गाई, म्हशी, विहिरी, मोट, अगदी चित्रात पाहावं तसं सगळं सगळीकडे होतं. आता जेवण झाल्यानंतर आम्हा सगळ्या बायकांच्या गप्पा रंगात आल्या. पुरुषांनी पथारी टाकली. पोरं चिंचेच्या, आंब्याच्या झाडाभोवती खेळत होती. इतक्यात आमच्या यांना फार उकडायला लागलं म्हणून, उठले आणि मोटेखाली पाणी घेऊन येतो म्हणून गेले. छान भरपूर पाण्याने आंघोळ केली. अंगावर अनेकदा पाणी घेतलं आणि यथेच्छ स्नान झाल्यानंतर अंग पुसायला टॉवेल घ्यायला म्हणून जरा वाकले तर नेमका तिथे घसरड झाल्यामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते त्या विहिरीत पडले. धपदीशी आवाज झाला. त्या आवाजामुळे आम्ही सगळे आजूबाजूचे जीव खाऊन पळत सुटलो. पाहिलं तर हे पाण्यात पडले होते. माझ्या घशातून शब्दच फुटेना, छातीवर दडपण आल्यासारखं झालं.... इतक्यात माझ्यासमोर लख्ख प्रकाश पडला आणि लाकूडतोड्याच्या गोष्टीतला तो देव माझ्यासमोर कोणालातरी घेऊन उभा राहिला...अरेच्चा हा तर आमच्या लहानपणीचा संजू... पण कसातरीच दिसत होता, अनेक दिवस उपाशी असल्यासारखा, ओढलेला चेहरा, वाढलेले केस, फाटके कपडे, त्याला बहुतेक नोकरीसुद्धा नसावी. तसाच कसातरी तो दिसत होता. आता माझ्या मनातून त्या संजूचा विचार पटकन नाहीसा झाला.
पूर्वार्ध