For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ब्राझीलच्या निवडणुकीत लुला डी सिल्वा विजयी

06:58 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्राझीलच्या निवडणुकीत लुला डी सिल्वा विजयी
Advertisement

चौथ्यांदा होणार अध्यक्ष, बोल्सोनारो यांना धक्का

Advertisement

वृत्तसंस्था/ रिओ-डी-जानेरो

दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश असणाऱ्या ब्राझील येथे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला डी सिल्वा यांच्या विजय झाला आहे. ब्राझीलच्या निवडणूक न्यायालयाने घोषित केलेल्या निकालानुसार लुला यांना 51.8 टक्के तर त्यांचे प्रतिस्पर्धी फ्लाव्हिओ बोल्सोनारो यांना 48.2 टक्के मते मिळाली आहे. या विजयामुळे लुला हे चौथ्यांदा ब्राझीलचे अध्यक्ष होणार आहेत.

Advertisement

ब्राझीलमध्ये गेल्या रविवारी मतदान झाले. मात्र, मतदानकाळात बऱ्याच वादग्रस्त घटना घडल्या. मतदानाचा कालावधी ऐनवेळी काही तासांनी वाढविण्यात आला. तसेच मतदारांवर दबाव आणल्याचे आणि अनेक मतदारांना मतदान करुन न दिल्याचे आरोपही करण्यात आले. मात्र, सोमवारी मतगणना पूर्ण झाल्यानंतर लुला विजयी झाल्याची घोषणा तेथील निवडणूक न्यायालयाकडून करण्यात आली आहे.

अनपेक्षित परिणाम

दक्षिण अमेरिकेत गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक देशांमध्ये उजव्या विचारसरणीची सरकारे निवडून आली आहेत. त्यामुळे ब्राझीलमध्येही डाव्या विचारसरणीच्या लुला यांना यावेळी धक्का बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, लुला यांनी अनपेक्षितरित्या विजय मिळविला आहे, असे तज्ञांचे मत आहे. या निवडणुकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लुला यांचे प्रतिस्पर्धी फ्लाव्हियो बोल्सोनारो यांचे समर्थन केले होते. त्यामुळे हा परिणाम त्यांच्यासाठीही धक्कादायक मानला जात आहे. लुला यांनी परिणामानंतर मतदारांचे आभार मानले आहेत.

बोल्सोनारो यांना विरोध

ब्राझीलचे माजी अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांनी या निवडणुकीत आपला ज्येष्ठ पुत्र फ्लाव्हियो बोल्सोनारो याला उमेदवारी मिळवून दिली होती. तथापि, मतदारांनी ही घराणेशाही नाकारल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या देशातील मतदारांचा बोल्सोनारो यांना विरोध होता, असे दिसून येत आहे. तथापि, लुला यांना इतके समर्थन मिळेल, याचे अनुमान निवडणूक जाणकारांना आधी काढता आले नव्हते, हे देखील या निकालावरून अगदी स्पष्ट होत आहे.

भारतावर काय परिणाम होणार

  1. लुला यांच्या कार्यकाळात भारत आणि ब्राझील यांच्यातील व्यापारी संबंध वृद्धिंगत झालेले आहेत. परस्पर व्यापाराचे 2026 चे ध्येय 20 अब्ज डॉलर्सचे आहे. आता लुला पुन्हा अध्यक्ष होणार असल्याने व्यापारी संबंध अधिक दृढ होतील.
  2. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचे ‘ग्लोबल साऊथ’ या संकल्पनेला सक्रीय समर्थन आहे. लुला यांच्या नव्या कार्यकाळात ही संकल्पना अधिक दृढ होईल, अशी शक्यता आहे. ते पुढील वर्षाच्या प्रारंभी भारताला भेट देणे शक्य आहे.
  3. लुला यांच्या माध्यमातून भारत अन्य दक्षिण अमेरिकन देशांशी दृढ संबंध प्रस्थापित करू शकतो, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या चार वर्षांमध्ये लुला यांनी आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये भारताच्या समर्थनाची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
Advertisement
Tags :

.