सोलापुरातील 'लकी' शेतकऱ्यांना लागली साहित्याची लॉटरी!
भरघोस अनुदानावर कडबाकुट्टी, पाणबुडी मोटार, रोटावेटर आणि ताडपत्रीचा लाभ
सोलापूर :
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध कृषी साहित्ये ५० टक्के अनुदानावर वितरित करण्यासाठी मंगळवारी (ता. १२ ऑगस्ट) जिल्हा परिषद कार्यालयात लॉटरी पद्धतीने लाभार्थींची निवड करण्यात आली. यामध्ये कडबाकुट्टी मशीन, पाणबुडी मोटार, रोटावेटर आणि ताडपत्री यांसारख्या उपयुक्त औजारांचा लाभ अनेक 'लकी' शेतकऱ्यांना मिळाला.
जिल्हा परिषदेमध्ये पार पडलेल्या या प्रक्रियेवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, तसेच कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. लाभार्थींची निवड यशवंतराव सभागृहात लॉटरी पद्धतीने करण्यात आली. विशेष म्हणजे, शाळेतील मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ही निवड पारदर्शकपणे करण्यात आली.
या योजनेसाठी जिल्ह्यातून एकूण २१,५५४ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यामधून २,४४९ शेतकऱ्यांची निवड लॉटरीद्वारे करण्यात आली. शेतकऱ्यांनी पंचायत समिती स्तरावर ३० जून २०२५ पर्यंत अर्ज सादर केले होते.
ही योजना जिल्हा परिषद सेस फंडातून सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून राबवली जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानित दरात आधुनिक कृषी साहित्य पुरवले जात असून, शेती सुलभ व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.